औरंगाबाद : मिटमिटा येथील मातोश्री पार्क अपार्टमेंटमधील फ्लॅटची विक्री करताना ग्राहकांकडून अडीच लाख रुपये आगाऊ रक्कम घेतली. मात्र तब्बल चार वर्षांनंतरही बिल्डरने नियोजित अपार्टमेंटची जागा दुसऱ्या एका व्यक्तीला विक्री केली. याप्रकरणी बिल्डरसह दोन जणांविरोधात क्रांतीचौक ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय मंझा व मंजित पांडे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-२ येथील रहिवासी संजय मांडवगड यांनी नोव्हेंबर २०१२ मध्ये आरोपींकडून मिटमिटा येथील मातोश्री पार्कमधील बी इमारतीतील फ्लॅट क्रमांक ४ हा तेरा लाखांत खरेदी केला. त्यासाठी त्यांनी २८ नोव्हेंबर २०१२ रोजी आरोपी मंझा यास ५१ हजार रुपये बुकिंग रक्कम म्हणून दिली. त्यानंतर ७ जानेवारी २०१३ रोजी धनादेशाद्वारे दोन लाख रुपये अदा केले. ही रक्कम घेतल्यानंतर आरोपीने नियोजित गृहनिर्माण प्रकल्पाची जागा मंजित मांडे यांना विक्री केली. साडेतीन वर्षांपासून या गृहप्रकल्पाचे बांधकाम बंद पडलेले आहे. याबाबत मांडवगड यांनी दोन्ही आरोपींकडे सतत चौकशी केली तेव्हा त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून बांधकाम सुरू करण्यास तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले. शेवटी त्यांनी आरोपींकडे एक तर आमचा फ्लॅट द्या अन्यथा आगाऊ घेतलेली रक्कम परत करा, असा तगादा लावला. मात्र आरोपींनी त्यांना पैसेही परत केले नाही आणि गृहप्रकल्पाचे बांधकामही ते करीत नसल्याचे समोर आले. आरोपींनी आपली फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी क्रांतीचौक ठाण्यात दाखल केली आहे.
फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम घेतली, मात्र बांधकामच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2016 12:20 AM