नांदेड - तापमानात वाढ होत असल्याने दिवसेंदिवस पाणीटचाईचे चटके सोसावे लागत आहेत. त्याचा परिणाम विहिरी, बोअरमधील पाणीपातळी घटल्याने आजघडीला मुखेड तालुक्यातील ७४ गावांत ५९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील सावरगाव, दापका गुंडोपंत, जांब, बाऱ्हाळी, रत्त्नातांडा, मानसिंगतांडा यासह अनेक वाडी-तांड्यावर पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून टँकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी नागरिकांसह महिला लहान मुलांची झुंबड उडत आहे. अनेक ठिकाणी पाणी घेण्यावरुन किरकोळ भांडणतंटेही होत आहेत. पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न निर्माण झाल्याने अंघोळीला वापरलेले पाणी धुण्यासाठी पुन्हा वापरण्यात येत असल्याचे चित्रही मुखेड तालुक्यातील काही भागात पहावयास मिळाले. याशिवाय जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याच प्रश्न गंभीर होत असल्याने मोठ्या संख्येने जनावरे विक्रीसाठी आठवडी बाजारात आणली जात आहेत. त्यामुळे जनावरांचे भावही कमी झाले असून घेण्यासाठी कोणीही धजावत नसल्याचेही चित्र दिसत आहे. पाणीटंचाईमुळे अनेक गावातील नागरिक स्थलांतरित होत असून पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे़ ही परिस्थिती पुढील महिन्यात अधिक भयावह होणार आहे़ दुष्काळाच्या झळांनी वाडी, वस्ती, तांड्यावरील गोरगरीब माणूस होरपळून निघाला आहे़ पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही़़़ अशा परिस्थितीत जगायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करून शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब माणूस शेतशिवार वाऱ्यावर सोडून व घराला कुलूप लावून मुलांबाळांसह वाट मिळेल तिकडे निघाला आहे़ गावात राहिलेले मात्र पाण्यासाठी संघर्ष करत आहेत़ मुखेड तालुक्यातील दापका आणि भवानीतांडा या गावातील पाण्यासाठी चाललेली ही लढाई भयान अशी आहे़ अबालवृद्धांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे़ उन्हाच्या चटक्यांसोबतच पाण्याच्या झळांनी गावे ओस पडली आहेत़
झरा आटला, जीव थकला़़़
By admin | Published: March 13, 2016 2:36 PM