नांदेड : नांदेडसह राज्यातील २० विमानतळे रिकामी असताना, महाराष्ट्रासाठी आलेले ८० प्रवासी क्षमतेचे विमान मुंबई येथून गुजरातसाठी जाते़ ही बाब एअर इंडियाच्या लक्षात आणून देत, माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण यांनी नांदेडची विमानसेवा पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत़ दरम्यान, लवकरच कमी प्रवासीक्षमता असलेले विमान नांदेडच्या धावपट्टीवरुन उड्डाण करेल अशी शक्यता वर्तविली जात आहे़राज्यातील विमानतळांच्या यादीत नांदेडचे विमानतळ सुसज्ज व सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे़ प्रदीर्घ काळ दिल्ली तसेच मुंबई येथून नांदेडसाठी विमानसेवा सुरु राहिली होती़, परंतु प्रवाशांची अनाठायी अडचण समोर करीत, विमानसेवा बंद करण्यातच यंत्रणेने आपला वेळ खर्ची केला़ दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेवून विकसनशील भागांना जोडणारी विमानसेवा सुरु ठेवावी अशी आग्रही मागणी केली़ मागील सत्ताकाळात राज्यामध्ये २० विमानतळे विकसित झाली़ नांदेड येथे शीख बांधवांचे पवित्र स्थळ सचखंड गुरुद्वारा आहे़ जगभरातून शीख बांधव नांदेडला येतात़ तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या शहराला व्यापार व उद्योगाच्या विकासासाठी विमानसेवेचा मोठा लाभ होवू शकतो़ त्यामुळे किमान एअर इंडियाने तरी, कमी प्रवासी क्षमतेचे विमान राज्यातील महत्वाच्या विमानतळावरुन उड्डाण करेल याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली होती़ नांदेड येथून यापूर्वी गो एअर आणि किंगफिशर या दोन कंपन्यांची विमाने उड्डाण करीत होती़ सुरुवातीला गो एअर आणि त्यानंतर किंगफिशरने सेवा बंद केली़नांदेड येथून केवळ नांदेडच नव्हे तर परभणी, हिंगोली, लातूर, बीड या जिल्ह्यांनाही हवाई वाहतुकीचा लाभ होणार आहे़ सद्य:स्थितीत औरंगाबाद अथवा हैदराबाद येथूनच सदर सुविधा उपलब्ध होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते़ ज्यामुळे उद्योग व्यवसायासाठी येणारी मोठी शिष्टमंडळे, उच्च तंत्रज्ञानाशी निगडित मनुष्यबळ सहजपणे उपलब्ध होत नाही़ एकूणच या भागाच्या विकासासाठी नांदेडच्या सुसज्ज विमानतळावरुन एअर इंडियाचे कमी क्षमतेचे विमान धावले पाहिजे, अशी आग्रही मागणीही खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली आहे़ या अनुषंगाने एअर इंडियाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून नांदेडच्या धावपट्टीवरुन लवकरच विमान उड्डाण करेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे़ (प्रतिनिधी)