औरंगाबाद : औरंगाबादमधील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरण प्रक्रियेला वेग दिला जात आहे. निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विमानतळाच्या जमिनीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विमानतळाचा नकाशा तयार होताच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात रायपूरसोबत औरंगाबाद अशा एकत्रितपणे विमानतळाचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे समजते.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सप्टेंबर २०२१मध्ये देशातील १३ विमानतळांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला. या १३ विमानतळांमध्ये औरंगाबादचा समावेश आहे. देशातील अमृतसर, भुवनेश्वर, इंदूर, रायपूर, त्रिची आणि वाराणसी या ६ मोठ्या विमानतळांचे आणि हुबळी, तिरुपती, औरंगाबाद, जबलपूर, कांगरा, कुशीनगर, गया या ७ छोट्या विमानतळांचे खासगीकरण करण्याचे ठरले. चिकलठाणा विमानतळावरील सोयी-सुविधा आता चांगल्या आहेत. खासगीकरणामुळे त्यात पुढे आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले, विमानतळाचे खासगीकरण होणार आहे. सध्या विमानतळ जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया सुरु आहे.
विमानतळाचा का वाढला तोटा ?शिर्डी, नांदेड विमानतळावरून विमानसेवा सुरू झाली. शिर्डीसह मराठवाड्यातून दिल्ली, मुंबईला जाण्यासाठी विमान प्रवासी औरंगाबादला येत असत. परंतु, शिर्डी विमानतळ औरंगाबादलाही मागे टाकू पाहत आहे. त्यात कोरोनाचाही मोठा फटका बसला. औरंगाबादहून नव्या विमानसेवा, देशभरातील विविध शहरांना हवाई कनेक्टिव्हिटीची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी, प्रवासी संख्या, विमाने वाढत नसल्याचा फटका चिकलठाणा विमानतळाला बसत असून, सलग ३ वर्षांपासून नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. यात २०२०-२१ या वर्षामध्ये ४०.५५ कोटींचा तोटा झाला.
३ वर्षांतील स्थितीचिकलठाणा विमानतळाला वर्ष २०१८-१९मध्ये ५८.७१ कोटी, वर्ष २०१९-२०मध्ये ५८.०८ कोटी आणि २०२०-२१मध्ये ४०.५५ कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या एका पत्राद्वारे काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. हा तोटा कमी करण्याच्या दृष्टीनेच खासगीकरणाचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे.