वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील सलामपुरे नगरात समस्येचा महापूर आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट आदी नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. पायाभूत सुविधा मिळत नसल्याने रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
स्थानिक ग्रामपंचायतीच्या उदासीन धोरणामुळे अनेक वर्षांपासून येथील पाणीप्रश्न सुटू शकलेला नाही. त्यामुळे दरवर्षी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागाला १० ते १२ दिवसांनंतर एकदा तेही कमी दाबाने पाणी मिळते. अनेकांच्या नळाला तर पाणीच येत नाही. मागील वर्षी ग्रामपंचायतीकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पण आता टँकरही येत नाही. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांना परिसरात भटकंती करुन विहिरी व बोअरवेलमधून पाणी आणावे लागत आहे. विशेष म्हणजे जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटल्याने व जीर्ण झाल्याने नळाला येणारे पाणीही गढूळ व दूषित येत आहे. विकतचे पाणी परवडत नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव हेच पाणी प्यावे लागत आहे. स्वच्छ अभियानांतर्गत जवळपास सर्वांनीच शौचालय बांधले आहेत. पण या भागात ड्रेनेजलाईनची सोय नसल्याने ड्रेनेज व सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे ड्रेनेजचे चेंबर चोकअप होऊन ड्रेनेज व सांडपाणी नागरिकांच्या घरालगत साचत आहे. सांडपाण्याच्या गटारीही उघड्यावरुन वाहतात. त्यामुळे दुर्गंधी व डासाचा फैलाव वाढला आहे. दूषित पाणी व घाणीमुळे साथीच्या आजाराची लागण होत असून लहान मुले सारखी आजारी पडत आहेत. त्यामुळे नागरिकांना आरोग्य विषयक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली असून, पथदिव्याचीही सोय नाही. चौकात बसविलेले पथदिवेही कायम बंद राहात असल्याने रस्त्यावर कायम अंधार असतो. अंधारामुळे नागरिकांना ये-जा करताना गैरसायीचा सामना करावा लागत असून, महिला व लहान मुलांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. एकूणच या भागात समस्येचा महापूर असल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याविषयी अनेकवेळा सांगूनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाही, असा आरोप येथील मंदाबाई हिवाळे, मंगल सोनवणे, बाळू कापसे, सागर शेजवळ, दीपक आमले, संतोष जाधव, अहिल्याबाई खरात, शशिकांत अडसूळ, जगन्नाथ गायकवाड, मीनाबाई घुले, आशाबाई कांबळे, संदीप घुले आदीं रहिवाशांनी केला आहे.