औरंगाबाद : वैजापूर तालुक्यात गोदावरी नदीत सोमवारी पहाटे ५ वाजता २ लाख ७६ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे गोदावरी नदीने पात्र सोडत गोदाकाठी असलेल्या बाबतारा, भालगाव, डोंणगाव अणि लाखगंगा येथील अनेक घरांत पाणी शिरले. यामुळे काही घरांतील साहित्य वाहून गेले. एनडीआरएफच्या जवानांनी ठिकठिकाणी सकाळपासून बचावकार्य करीत नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले.
रविवारी रात्री सलग तिसऱ्या दिवशी गोदावरी नदीला आलेल्या महापुराने दाणादाण उडवून दिली. बहुतांश गावांतील जनजीवन विस्कळीत झाले. नदीतून होणारा तुफानी विसर्ग जवळपास नदीकाठावरील सर्वच गावे अणि वाड्या-वस्त्यांना विळखा घातला. त्यामुळे सोमवारी महापुराचा इशारा देण्यात आल्याने या परिसरातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती. गोदाकाठावरील काही वस्त्यांमधील लोक पुरात अडकले होते. त्यापैकी १२ जणांना सोमवारी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वैजापूर, वीरगाव पोलिसांसह एनडीआरएफच्या जवानांची तुकडी ठिकठिकाणी सकाळपासून बचावकार्य करीत आहे. सोमवारी पहाटे पाण्याचा विसर्ग एवढा वेगात होता की, नदीकाठावरील अनेक घरांपुढील साहित्य, पत्रे, पाण्याच्या टाक्या, झाडे, विद्युत पोलदेखील गोदावरीच्या पात्राने कवेत घेतले होते. हे साहित्य वाहत जाऊन पुढे ठिकठिकाणी नदीकाठच्या कठड्यांना अडकल्याने लाटांचा तडाखा आणि धडकी भरवणारा आवाज येत होता.
गंगापूर तालुक्यात शेकडो एकर शेती पाण्यातगंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीला आलेल्या पुरात नदीकाठावरील शेकडो एकर शेतीमधील पिके पाण्याखाली गेली असून, रस्त्यावर पाणी आल्याने ममदापूरचा नेवरगावपासून संपर्क तुटला आहे. पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत.नाशिक जिल्ह्यात सर्वच धरणांतील पाण्याचा विसर्ग जायकवाडी प्रकल्पात सोडण्यात येत आहे. या पाण्याच्या रेट्याने गोदावरी नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे सोमवारी नेवरगाव येथील संकटेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. आगरकानडगाव, नेवरगाव, जामगाव, हैबतपूर, कायगाव, अंमळनेर, लखमापूर, आगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब शिवारातील जायकवाडी संपादित क्षेत्रात पाणी शिरले आहे. या पाण्यामुळे येथील कापूस, मका, ऊस, मूग, सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जुने नेवरगाव ते ममदापूर रस्ता बंद झाल्याने म्हसोबावाडी येथील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. मात्र, त्यांना रस्त्याऐवजी कानडगावकडे जाण्यासाठी कच्च्या रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसीलदार अरुण जºहाड यांनी ७ पथके तयार के ली असून, त्यात नायब तहसीलदार नामदेव देशटवाड, अभय बेलसरे, बी. डी. तेजीनकर, सदाशिव पंदुरे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.