औरंगाबाद : इस्कॉनच्या वतीने सिडको एन वन येथील राधा-कृष्ण मंदिरात रविवारी रात्री जेव्हा श्री जगन्नाथ, बलदेव व सुभद्राच्या मुखवट्यावर (अर्चाविग्रहां) विविध रंगीबेरंगी फुलांचा अभिषेक करण्यात आला. तेव्हा हे दृश्य पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
महोत्सवास सायंकाळी ६.०० वाजता सुरुवात झाली. मृदंग,टाळ, पेटी, बासरी अशा पारंपरिक व आफ्रिकन ड्रम, झांच अशा आधुनिक वाद्यांच्या साथीने '' हरे कृष्णा'' हे भजन म्हणत महोत्सवात वेगळाच रंग भरला. त्यानंतर इस्कॉन औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. रोहिणीप्रिय प्रभूद्वारा यांनी भाविकांशी ऑनलाईन संवाद साधला. भक्त आपल्या प्रामाणिक प्रयत्न आणि भक्तिभावातून कसे भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करतात, हे श्रीमद् भागवत व भगवदगीतेचा संदर्भ देऊन त्यांनी सांगितले. त्यानंतर भगवंताना विविध व्यंजनांचे १०८ भोग अर्पण करण्यात आले. भगवान श्री जगन्नाथाची महाआरती करण्यात आली. नंतर अर्चाविग्रहांचा(मूर्तींचा) १५० किलो फुलांच्या पाकळ्यांनी अभिषेक करण्यात आला. यासाठी झेंडू, शेवंती, गुलाब, बिजली, निशिगंध, कुंदाकली, केवडा, ऑर्किड, गलांडा, जरबेरा अशी विविध फुले मागविण्यात आली होती. रात्री १० वाजता “हरे कृष्ण” महामंत्राचे कीर्तन श्रवण करीत १०० हून अधिक भक्तांनी फुलांच्या पाकळ्या काढण्यास सुरुवात केली. अभिषेक केलेल्या पाकळ्यांच्या महाप्रसादाचा सर्व भक्तांवर वर्षाव करण्यात आला.