औरंगाबाद : यंदा दुष्काळात शेती व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. फुलांचे उत्पादनही घटले आहे. पण मागणी नसल्याने फुलांचे भाव स्थिर आहेत. पण येत्या काळात १६ लग्नतिथी आहेत. शिवाय लोकसभा निवडणूक आल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. यामुळे फुलांना ‘भाव’ चढणार आहे. मात्र, यासाठी बाजाराला रणधुमाळीची प्रतीक्षा आहे.
शालेय व महाविद्यालयीन परीक्षेचा काळ असल्याने लग्नतिथी असूनही या काळात लग्नाचे प्रमाण कमी असते. मार्च महिन्यात ६ लग्नतिथी बाकी आहेत, तसेच एप्रिल महिन्यात १० लग्नतिथी आहेत. त्यामुळे फुलांना मागणी राहील. विशेषत: उन्हाळ्यात ग्रामीण भागात विवाह लावण्याची संख्या अधिक असते. मात्र, यंदा दुष्काळामुळे त्यात किती फरक पडतो, याचा अंदाज पुढील महिन्यातच लक्षात येईल. पण, आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. एप्रिल महिन्यात जसजसे तापमान वाढत जाईल तसतसे राजकीय तापमानही चढत जाणार आहे. मिरवणुका, प्रचारफेरी, जाहीर सभा यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघणार आहे.
या काळात स्वागत, सत्कारासाठी हारांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. निवडणुकीत जेवढे जास्त उमेदवार तेवढी हारांची विक्री अधिक असते. यामुळे बंडखोर उमेदवार जेवढे जास्त उभे राहतील तेवढे या फूल व्यवसायाच्या दृष्टीने चांगले मानले जाते. फुलांचे व्यापारी बबलूशेठ यांनी सांगितले की, सध्या सिटीचौक, अत्तरगल्ली परिसरात मिळून दररोज दीड ते दोन टन फुलांची आवक होत आहे. यंदा पाण्याअभावी उत्पादन घटले आहे. पण मागणी वाढली तर येथील व्यापारी राज्यातूनच नव्हेतर परराज्यांतूनही फुले मागवतील, एवढी क्षमता त्यांच्यात आहे.
गलांडा २५ ते ३० रुपये किलो तर झेंडू २० ते ५० रुपये किलोदरम्यान विकला जात आहे. बिजलीचा हंगाम संपत आला आहे. ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने बिजली विकली जात आहे. निवडणुकीत गुलाबांच्या हाराचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. शहरात शिर्डीहून गुलाब मागविला जातो. तापमान वाढत असल्याने प्लास्टिकच्या मोठ्या गोणीत गुलाबात बर्फाचे तुकडे टाकून आणले जाते. यामुळे गुलाब बराच वेळ टवटवीत राहतो. मागणी नसल्याने सध्या १ रुपयास एक गुलाब विकला जातो. मागणी वाढल्यास फुलांना ‘भाव’ चढेल. यामुळे शेतकरीही रणधुमाळीची वाट पाहत आहे.
मोगरा फुलला...सिटीचौकातील फूल बाजारात सध्या मोगऱ्याचा सुगंध दरवळू लागला आहे. उन्हाळ्याला सुरुवात होताच बाजारात नवीन मोगऱ्याची आवक सुरू झाली आहे. टपोरा, टवटवीत मोगरा पाहताच ‘मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियांसी आला’ या गीताची आठवण प्रत्येकाला होत आहे. १५० ते २०० रुपये किलोप्रमाणे मोगरा विकला जात आहे. तर मोगऱ्याचा झेला (विणलेला मोठा गजरा) १५० ते २०० रुपये (४०० ग्रॅम) विकल्या जात आहे. खास करून लग्नात या मोगऱ्याला अधिक मागणी असते.