- शब्बीर शेखदेगलूर: राष्ट्रीय कला महोत्सवात बासरी वादनात भारतातून प्रथम क्रमांक पटकावत होट्टल येथील राधिका सुवर्णकार हिने देगलूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. आता तिला दिल्ली येथे होणाऱ्या परीक्षा पे चर्चा आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होण्याचे पत्र मिळाले आहे. दि. 24 ते 29 जानेवारी दरम्यान ती दिल्लीत दोन्ही कार्यकर्मात सहभागी असेल याबाबतचे एक पत्र नुकतेच राधिका शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयास प्राप्त झाले आहे.
केंद्र शासनाकडून दिल्लीत 'परीक्षा पे चर्चा ' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात राधिकाचा सहभाग राहणार आहे. सोबतच 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या संचलनाच्या कार्यक्रमातही राधिका सुवर्णकारचा विशेष सहभाग राहणार आहे. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या पत्रानुसार शिक्षणाधिकारी नांदेड यांनी 19 जानेवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या नावे पत्र देऊन कळविले आहे. यानुसार आज राधिका आपल्या काकासोबत दिल्लीकडे रवाना झाली आहे.
शेत मजूराच्या मुलीची भरारी शहरातील श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावी वर्गात शिकत असलेल्या राधिका सुवर्णकार या विद्यार्थिनीने नुकतेच 9 ते 12 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कला उत्सव या राष्ट्रीय स्पर्धेत बासरी वादन या कला प्रकारातून सहभाग घेतला. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राधिकाने यशाला गवसणी घालीत भारतातून प्रथम क्रमांक पटकावला. या यशाची दखल घेत केंद्र शासनाने नवी दिल्ली येथे 24 ते 29 जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांत राधिकास आमंत्रित केले आहे. एका शेत मजुराच्या मुलीने उत्तुंग भरारी घेत ग्रामीण भागातील होट्टल ते दिल्ली असा प्रवास थक्क करणारा आहे. राधिकाचे हे यश ग्रामीण भागातील कलावंतांना नक्कीच प्रेरणादायी देणारे ठरत आहे.