औरंगाबाद : केंद्र स्मार्ट सिटी अभियानात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) वर फोकस राहणार आहे. मनपा प्रशासनाने याच दृष्टीने स्मार्ट सिटीच्या आराखड्याचे नियोजन करावे, अशा सूचना हैदराबाद येथे सुरू असलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी अभियानाच्या विषयावर हैदराबाद येथे दोनदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा सुरू आहे. मनपा आयुक्त प्रकाश महाजन आणि जिल्हाधिकारी निधी पांडे या कार्यशाळेस हजर आहेत. दोन्हीही अधिकारी रविवारीच हैदराबादेत पोहोचले आहेत. या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी आयटी सिटीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अभियानासाठी औरंगाबादसह देशभरातील शंभर शहरांची निवड केली आहे. या शहरांना पायाभूत सुविधांसाठी भरीव निधी दिला जाणार आहे. त्यासाठी सर्व शहरांकडून त्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हैदराबाद येथे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत स्मार्ट सिटीचे नियोजन कसे असावे, याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. शंभर शहरांचे महापौर, आयुक्तांचा समावेश हैदराबादेतील कार्यशाळेसाठी स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतिम स्पर्धेसाठी निवड झालेल्या शंभर शहरांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार या शहरांचे महापौर, मनपा आयुक्त तसेच संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी कार्यशाळेस उपस्थित आहेत. औरंगाबादचे महापौर त्र्यंबक तुपे हे मात्र तब्येत बरी नसल्यामुळे कार्यशाळेला गेलेले नाहीत.
स्मार्ट सिटी योजनेत आयटी सिटीवर फोकस
By admin | Published: September 08, 2015 12:29 AM