धार्मिक, सामाजिक देखाव्यांवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:53 AM2018-09-12T00:53:45+5:302018-09-12T00:54:11+5:30
अवघ्या एका दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. शहरातील मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे उभारण्याची जय्यत तयारी सुरू असून, विशेषत: जुन्या शहरातील काही गणेश मंडळे यंदाही धार्मिक व सामाजिक विषयावरील देखावे उभारत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अवघ्या एका दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. शहरातील मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे उभारण्याची जय्यत तयारी सुरू असून, विशेषत: जुन्या शहरातील काही गणेश मंडळे यंदाही धार्मिक व सामाजिक विषयावरील देखावे उभारत आहेत.
शहागंज, गांधी पुतळा परिसरातील नवसार्वजनिक गणेश मंडळ यंदा ५० फूट उंचीची अक्षरधामची प्रतिकृती उभारत आहे. या मंडळाचे यंदा ३८ वे वर्ष आहे, तसेच गणेशोत्सवात जम्मू-काश्मीरच्या नृत्य कलाकारांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने शहागंज चमन चौकात संत तुकाराम महाराजांवर आधारित देखावा साकारणार आहे. जाधवमंडी येथील यादगार गणेश मंडळाने यंदा जागरण गोंधळाचा देखावा उभारला आहे. ४० बाय ५० फुटांच्या भव्य स्टेजवर हा देखावा उभारला जात आहे.
३० वर्षांपूर्वी चलदेखाव्याची सुरुवात या मंडळाने जागरण गोंधळापासून केली होती. यंदा मछलीखडक येथील संगम गणेश मंडळ म्युझिक लायटिंग तयार करीत आहे. याशिवाय चिकलठाण्यातील सावता गणेश मंडळ यंदा तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती उभारत आहे. छावणीतील गणेश मंडळ देखावा तयार करीत आहेत. देखावे तयार करणारे शहरात ठराविक गणेश मंडळे राहिली आहेत.
गणेशभक्तांच्या गर्दीने शहरातील बाजारपेठ बहरली
लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त त्याच्या स्वागताकरिता सजावटीचे साहित्य खरेदीसाठी मंगळवारी बाजारपेठेत गर्दी झाली होती.
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. प्रत्येक जण आपापल्या पसंतीनुसार सजावटीचे साहित्य खरेदी करताना दिसून येत आहे. विशेषत: गुलमंडी, मछलीखडक, सुपारी हनुमान रोड, पानदरिबा रोड, सिटीचौक, कुंभारवाडा, औरंगपुरा या परिसरात गर्दी दिसून आली. अनेक जण सहपरिवार खरेदीसाठी येत होते. याशिवाय सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोड, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर रोड, शिवाजीनगर, आविष्कार कॉलनी रोड, टीव्ही सेंटर परिसर या भागातही सजावटीचे साहित्य व श्रींची मूर्ती खरेदी करताना गणेशभक्त दिसून आले. गणरायापाठोपाठ आता महालक्ष्मीचे आगमन होत आहे. महालक्ष्मीचे मुखवटे, रेडिमेड साड्या, पत्र्याच्या कोठ्या खरेदीसाठी महिला वर्गही बाहेर पडल्याचे दिसून आले.
सुमारे ४ लाख मूर्ती शहरात
बाजारपेठेत स्थानिक, तसेच पेण, नगर, चिखली, अमरावती, अकोला शहरातून बाजारपेठेत लहान-मोठ्या ४ लाख मूर्ती दाखल झाल्या आहेत. औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर मूर्ती विक्रीचे ६० स्टॉल, सेव्हन हिल ते गजानन महाराज मंदिर रोडवर ८५ स्टॉल, टीव्ही सेंटर परिसरात ३० स्टॉलमध्ये लहान-मोठ्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक भागांतील मुख्य रस्त्यांवरील छोट्या स्टॉलवर, हातगाड्यांवर ५० पेक्षा अधिक विक्रेते आहेत.
यंदा ५ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीचे प्रमाण कमी आहे. १ ते ३ फुटांपर्यंतच्या मध्यम आकारातील मूर्ती अधिक असल्याची माहिती ठोक विक्रेते अशोक राठोड यांनी दिली.
कृत्रिम फुलांचा बहर
शहरातील फूल विक्रेत्यांनी कृत्रिम फुलांचा वापर करून आर्कषक कमानी तयार केल्या आहेत. प्रत्येक फूल विक्रेत्याच्या स्टॉलवर लहान-मोठ्या असंख्य कमानी आहेत. यात भारतीय व चायना बनावटीची कृत्रिम फुले आहेत. त्यात जास्वंद, गुलाब, मोगरा, सूर्यफूल,जाई-जुईच्या फुलांनी सजावट के ली आहे. असली कोणते व नकली कोणते, असा संभ्रम पडावा, अशी फुले बघण्यास मिळत आहेत. २०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांदरम्यान फुलांची सजावट विकली जात आहे.
मूर्तिकारांकडील लहान व मध्यम आकाराच्या मूर्ती किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केल्या. आता मूर्तिकारांनी मोठ्या आकारातील श्रींच्या मूर्तीच्या रंगरंगोटीकडे लक्ष दिले आहे. यंदा अत्यंत कमी गणेश मंडळांनी १० ते १५ फूट उंचीच्या मूर्ती बनवून घेतल्या आहेत. मूर्तीही रंगरंगोटीसाठी मूर्तिकारांकडे आल्या आहेत.