लातूर : मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या पाचही चारा छावण्या अवघ्या दोन महिन्यांत बंद केल्या आहेत़ परिणामी, चारा छावणीसाठी आलेला ४४ कोटींपैकी ३८ कोटींचा निधी टंचाई निवारणासाठी वर्ग करण्यात आला आहे़ केवळ चारा छावण्यांसाठी २६ लाखांचा निधी आतापर्यंत खर्ची केला असून, ५ कोटी ७४ लाख रुपये चारा छावण्यांसाठी जिल्हा प्रशासनाने आपल्या कोषात ठेवले आहेत़जिल्ह्यात ५ लाख १५० लहान-मोठ्या जनावरांची संख्या आहे़ त्यापैकी ३ लाख ३२५ दुधाळ जनावरे आहेत़ त्यात २ लाख ३२ हजार ५८४ गायी, म्हशी आहेत़ उर्वरीत शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे़ ५ लाख १५० पशुधनाला दिवसाला ३ हजार १६६ किलो चारा लागतो़ मात्र जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात चारा उपलब्ध नाही़ चाऱ्याच्या बाबतीत जिल्हा निरंक आहे़ तरीही जिल्ह्यातील पाचही चारा छावण्या बंद पडल्या आहेत़ या पशुधनाला ३ हजार १६६ किलो दररोज चारा लागतो़ परंतु सध्या चाराही नाही आणि छावण्याही नाहीत़ यामुळे पशुपालकांची अडचण झाली आहे़ आशिव, माळकोंडजी, तुपडी, रुदा आणि औसा तालुक्यातील एकंबी येथे चारा छावण्या सुरु होत्या़ परंतु या छावण्यात पशुधन येत नसल्यामुळे त्या बंद आहेत़ चारा छावण्या सुरु करण्यासाठी असणाऱ्या अटी जाचक होत्या़ त्यामुळे केवळ पाच छावण्या सुरु झाल्या़ त्याही बंद पडल्या आहेत़ त्यामुळे प्रशासनाने आलेल्या ४४ कोटीच्या निधीतून केवळ २६ लाखांचा खर्च केला असून, ५ कोटी ७४ लाखांचा निधी चाऱ्यासाठी राखून ठेवला आहे़ उर्वरित ३८ कोटींचा निधी शासनाकडे परत पाठवून टंचाई निवारणासाठी हा निधी वापरण्याची परवानगी मागितली होती़ शासनाने गेल्या दोन दिवसापूर्वी हा निधी टंचाई निवारणासाठी वर्ग करुन दिला आहे़ चारा छावण्याच्या जाचक अटी लक्षात घेता पशुधनाच्या दावण्यांना चारा देण्यात यावा किंवा निधी देण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक पशुपालकांनी प्रशासनाकडे केली आहे़ मात्र या मागणीकडे सध्या तरी दुर्लक्षच आहे़ दरम्यान, जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर, शिरुर अनंतपाळ, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट या दहाही तालुक्यात चारा उपलब्ध नाही़ जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय नाही़४जिल्ह्यात तुपडी, रुदा, एकंबी, माळकोंडजी आणि आशिव येथे छावण्या सुरु झाल्या तेव्हा ६५० लहान-मोठी जनावरे होती़ मात्र महिनाभरापूर्वी पशुपालकांनी ही जनावरे परत नेली़ त्यामुळे या छावण्या बंद झाल्या आहेत़ आतापर्यत झालेला त्यावरचा खर्च संबंधीत छावणी चालकांना दिला असून, चाऱ्यासाठी काही निधी यातला राखीव ठेवला आहे़ उर्वरित निधी टंचाईसाठी वर्ग करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिली़
चाऱ्याचा निधी टंचाईकडे वर्ग
By admin | Published: October 25, 2015 11:50 PM