औरंगाबाद : पंधरा दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या १८ होती, ती आता अडीचशेच्या घरात पोहचली असून, तपासणीचे प्रमाण वाढविले आहे. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून दक्ष राहण्याचे आवाहन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी केले.
सिडको येथील प्रियदर्शनी उद्यानात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर पाण्डेय म्हणाले की, शहरात हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शाळा, महाविद्यालये बंद केले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊन आरोग्य पथक तपासण्या करीत आहे. मास्क वापरण्यावर अधिक भर दिला असून, कडक कारवाई होत आहे. दररोज मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांना मास्क वापरणे, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग, हात स्वच्छ धुणे आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या नियमांचे पालन केले तर शहरात कोरोना आटोक्यात येईल.
रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. गरजेनुसार कोविड सेंटरची संख्या वाढवली जाईल. मागच्या वर्षी कोविडच्या काळात आलेले अनुभव लक्षात घेऊन ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याचे नियोजन केले आहे. मेल्ट्रोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभा केला जात आहे. महानगरपालिकेने विविध उपाययोजना हाती घेतल्या असून, कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णसंख्या वाढणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मात्र, नागरिकांनीही तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे, असे पाण्डेय यांनी सांगितले.