तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव जाधव यांनी सांगितले की, खुशी कलवले पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. सोबत पार्लरचे कामही करत होती. गारखेडा परिसरातील एका मुलासोबत तीन महिन्यांपूर्वी तिचा विवाह ठरला होता. मात्र, त्या मुलाने १५ दिवसांपूर्वी आत्महत्या केली. शनिवारी आई घराबाहेर बसलेली असताना खुशीने स्वयंपाकघरात फॅनला साडीने गळफास घेतला. ही बाब आईच्या लक्षात येताच तिने टाहो फोडला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने खुशीला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
नियोजित वराने आत्महत्या केल्याने खुशी मानसिक तणावात होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असावी असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. हाच प्राथमिक अंदाज हर्सूल पोलिसांनीही व्यक्त केला. या प्रकरणी हर्सूल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.