- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : शहरात दर आठवड्याला २० टनांपेक्षा अधिक शिळ्या पोळ्या कचऱ्यात फेकून दिल्या जातात. या पोळ्यांना चक्क किलोमागे ५ रुपयांचा भाव मिळतोय... जमा झालेल्या या पोळ्यांचेच नंतर पशुखाद्य तयार केले जाते. हे वाचून प्रत्येकाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.
मागील काही महिन्यांत शहरात शिल्लक पोळ्या कचऱ्यात फेकून देण्याचे प्रमाण वाढले आहे. शिळ्या कडक पोळ्या कुत्रेही खात नाहीत. त्यांनाही माणसाप्रमाणे ताज्या पोळ्या लागतात, असे बोलले जाते. अनेकजण शिल्लक राहिलेल्या पोळ्या जनावरे खातील म्हणून रस्त्यावर ठेवतात, तर काहीजण त्या अक्षरश: कचराकुंडीत फेकून देतात. अनेकजण त्या घंटागाडीत टाकतात. कचरावेचक तसेच घंटागाडीवाले या शिळ्या पोळ्या वेचून ५ रुपये किलो दराने विकतात. यावरच शहरातील काही परिवारांचा उदरनिर्वाह चालतो.
या जमा केलेल्या पोळ्या नारेगावातील पशुखाद्य बनविणाऱ्यांना ६ रुपये किलो दराने विकले जाते. नारेगावमध्ये ४ परिवार या शिळ्या पोळ्यांना चांगले वाळवितात. त्यानंतर त्यांना स्वच्छ करून मशीनद्वारे त्याचा भरडा तयार केला जातो. या भरड्यात गिरणीतील शिल्लक पीठ, दुकानात कचऱ्यात आलेली ज्वारी, गहू, डाळीं, खराब बिस्कीट, पाव, टोस्ट याचाही समावेश असतो. या भरड्याचेच पशुखाद्य तयार करून ते गोशाळा, म्हशी, गाईचे गोठ्यांना १२ रुपये किलोने विकले जाते. दररोज नारेगावातच ५० टनापर्यंत पशुखाद्य तयार होते. शिळ्या पोळ्यांवर प्रक्रिया करून पशुखाद्य बनविण्याच्या या व्यवसायात शहरात ७० पेक्षा अधिक कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे.
पोळ्या कचऱ्यात फेकून देऊ नयेआपण एवढे कष्ट करतो ते अन्नासाठीच. शक्यतो पोळ्या शिल्लक राहू नये. जर शिळ्या पोळ्या राहिल्या, तर त्या कचऱ्यात फेकून देऊ नका. घंटागाडीत द्या. कारण, त्या पोळ्याचे पशुखाद्य तयार करून जनावरांच्या कामी येतात.- शेख नसीफ, शिळ्या पोळ्या खरेदीदार
गोठ्यावाल्यांना विकतात पशुखाद्यमागील वर्षभरात शिळ्या पोळ्या येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांचे मशीनवर भरड तयार केली जाते. हे पशुखाद्य गोठ्यावाले खरेदी करतात. खल्लीपेक्षाही हे पशुखाद्य स्वस्त पडते. आठवडाभरात ४० टनांपेक्षा अधिक पशुखाद्य विक्री होते.- शेख सईद, पशुखाद्य विक्रेता