औरंगाबाद - पडेगावच्या कासम बरी दर्गा परिसरातील मदरशात धार्मिक शिक्षण घेणाऱ्या 67 विद्यार्थिनींना मंगळवारी रात्री सिल्लेखाना येथे सलमान कुरैशी यांनी दावत दिली. जेवणानंतर काही वेळातच सर्व विद्यार्थिनींना मळमळ होऊन उलटया होऊ लागल्याने त्यांना त्वरित घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असून इतर सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले आहे. या घटनेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरताच घाटी रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती.
पडेगाव परिसरात कासमबरी दर्गाजवळ राबिया बसरिया हा मुलींचा मदरसा आहे. येथील विद्यार्थिनींना समाजातील अनेक नागरिक छोट्या-मोठ्या कार्यात दावत देत असतात. मंगळवारी सिल्लेखाना येथील सलमान कुरेशी यांच्याकडे मुलींना दावत होती. 7.30 च्या सुमारास मुलींनी जेवण केले. त्यानंतर त्यांना एका टेम्पोतून परत पडेगाव येथे नेण्यात आले. दरम्यान, काही मुलींना उलट्या आणि मळमळ सुरू झाली. मदरशात पोहोचल्यानंतर बहुतांश मुलींची प्रकृती खालावत होती. यावेळी परिसरातील नागरिकांनी जमेल त्या वाहनांनी सर्व मुलींना घाटी रुग्णालयात दाखल केले. घाटी प्रशासनाला मास कॅज्युअल्टीची माहिती मिळाल्याने काही रुग्णवाहिकादेखील घटनास्थळी पाठविण्यात आल्या.
बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक 24 मध्ये 31, तर आपत्कालीन लिथोट्रिप्सी कक्षात 36 मुलींना दाखल करण्यात आले आहे. बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रतिभा खैरे, डॉ. अमोल सुर्यवंशी, डॉ. समाधान प्रदीप, डॉ. सय्यद, डॉ. उबेर, डॉ. अमीर, डॉ. अंजू, डॉ. नीला, डॉ. कुमेश, डॉ. नीलेश, डॉ. अश्विनी आणि वॉर्ड इन्चार्ज रजनी कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी मुलींची सुश्रूषा करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने यांनी रुग्णालयात धाव घेतली.
नागरिकांचा आरोप
कासमबरी दर्गा भागातील रहिवासी रफिक कुरेशी यांनी मदरशा प्रशासनाने ही घटना दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच 67 विद्यार्थिनींना एकाच टेम्पोतून कोंबून नेल्याने त्यांच्या जिवाशी खेळल्याचेही ते म्हणाले. तर मदरशा प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.
राजकीय मंडळींमध्ये चढाओढ
मदरशीतील विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची वार्ता समजताच घाटी रुग्णालयात राजकीय नेत्यांची रांग लागली. आ. सतीश चव्हाण, इम्तियाज जलील, अब्दुल सत्तार, महापौर नंदकुमार घोडेले यांनी रुग्णालयात धाव घेतली.