वैजापूर (औरंगाबाद) : बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्ल्याने १९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथील अरबी मदरशामध्ये घडली.
यातील चौघांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविले असून, उर्वरित विद्यार्थ्यांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहंमद नबी हसन (११), मोहंमद लुकमान रिझवान (८), मोहंमद मासूम समीर (१०) व अब्दुल रहिम रशीद (८) या चौघांना उपचारासाठी औरंगाबादला पाठवण्यात आले आहे.
हे सर्व विद्यार्थी गोळवाडी येथे अरबीया अनसार ए मदिना नावाच्या मदरशामध्ये शिकतात. ते सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मैदानावर खेळत होते. यावेळी त्यांनी बदाम समजून एरंडीच्या बिया खाल्ल्या. त्यामुळे काही वेळातच त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच सर्व विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर चार जणांना औरंगाबादला पाठवण्यात आले.
मोहंमद साहेब, मोहंमद मनसब, मोहंमद इसरार, मोहंमद हाफिज, मोहंमद शादाब, मोहंमद इश्तियाक, मोहंमद रयान, मोहंमद मुकातीम, मोहंमद गुल नवाब, मोहंमद शहानवाज, मोहंमद फुरकान, मोहंमद मुर्तजीर, मोहंमद वक्स व मोहंमद गुल फराज यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, वाहेद पठाण, शकील तंबोली, ऐराज शेख, साबीर खान, शेख आसिफ यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.