वैजापूर (औरंगाबाद) : उपवासाची भगर खाल्ल्याने तालुक्यातील जवळपास ५२४ नागरिकांना बुधवारी विषबाधा झाली असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत.
लासूर स्टेशन येथे मंगळवारी भगर खाल्ल्याने १३ जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. बुधवारी वैजापूर तालुक्यात सकाळपासून भगरने विषबाधा झालेले रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल होण्यास सुरुवात झाली. मळमळ, उलट्या होत असल्याने रुग्ण मोठ्या प्रमाणात दवाखान्यात दाखल झाले. सर्वांनी भगर खाल्ल्याचे सांगितले. वांजरगाव, डवाळा, नगिना पिंपळगाव, आलापूरवाडी, आघूर आदी अनेक गावांतील ग्रामस्थांना विषबाधा झाली. शहरात १०६ रुग्णांची नोंद अधिकृत नोंद झाली असली तरी विविध शासकीय व खासगी रुग्णालयात जवळपास ५२४ च्या वर रुग्ण उपचार घेत आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधव, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी विविध रुग्णालयांना भेट दिली. अन्न सुरक्षा अधिकारी जाधव यांनी भगरीचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. याबाबत येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे म्हणाले, सध्या उपजिल्हा रुग्णालयात १२० रुग्ण उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयात व ग्रामीण भागातही दवाखान्यात रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी शक्यतो भगर खाण्याचे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
कन्नड तालुक्यात १२ जणांना विषबाधाउपवासाची भगर खाल्ल्याने तालुक्यातील १२ जणांना बुधवारी विषबाधा झाली. उलट्या आणि मळमळ होऊ लागल्याने त्यांना कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी आठ जणांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले. मुंडवाडी तांडा व बोलटेक तांडा प्रत्येकी २, नांदगीर वाडी, चिंचखेडा, चापानेर व बनशेंद्रा येथील प्रत्येकी एकावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर जैतापूर येथील २ व बिपखेडा आणि कारखाना येथील प्रत्येकी एका रुग्णावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साध्या पँकिंगमधील भगरीच्या पिठाचा फराळात वापर केल्याने विषबाधा झाली, असे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी सांगितले.