विठ्ठल भिसे, पाथरीपाथरी विधानसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडे जंगम आणि स्थावर मालमत्ता कोट्यवधी रुपयांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे त्यांच्या कुटुंबासह तब्बबल २० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी, शिवसेनेकडून मीराताई रेंगे, काँग्रेसकडून सुरेश वरपूडकर, मनसेकडून हरिभाऊ लहाने आणि अपक्ष मोहन फड या प्रमुख पाच उमेदवारांचा समावेश आहे. अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले मोहन फड हे दहावी पास आहेत. त्यांच्याकडे २ लाख रुपयांची नगद रोकड असून ११ लाख ४८ हजार रुपयांचे मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने आहेत. इतर मालमत्ता मिळून १ कोटी १५ लाख ४८ हजार रुपये किंमतीची मालमत्ता आहे. स्थावर मालमत्तेमध्ये ५ कोटी ८७ लाख तर निवासी इमारतीमध्ये २ कोटी ७५ लाख रुपयांचा समावेश आहे. त्यांच्याकडे स्थावर ८ कोटी ६२ लाख असून जंगम मालमत्ता १ कोटी १५ लाख ४८ हजार रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे १ कोटी ४३ लाख रुपयांचे विविध कर्ज आहेत. शिवसेनेच्या उमेदवार मीराताई रेंगे यांचे शिक्षण १२ वी झाले असून त्यांच्याकडे ८ लाख व पतीकडे २ लाख असे १० लाख रुपयांची रोकड आहे. सोने- चांदीच्या वस्तू १५ लाख रुपये, पतीकडे १३ लाख ६८ हजार रुपये, स्थावर मालमत्ता ५५ लाख ६० हजार रुपये तर पतीच्या नावे १ कोटी १२ लाख रुपयांची मालमत्ता आहे. बिगर शेती मालमत्ता २२ लाख रुपये असून मुंबई येथे ६० लाख रुपयांचा प्लॅट व पतीच्या नावे १५ लाख रुपयांची इमारत आहे. मीराताई रेंगे यांच्याकडे एकूण १ कोटी ८० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता असून त्यांचे पती कल्याणराव रेंगे यांच्याकडे १ कोटी २७ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्यावर ३० लाख ८१ हजार रुपयांचे कर्ज तर पतीच्या नावे २ लाख ४६ हजार रुपयांचे कर्ज आहे. जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून २ कोटी १० लाख रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडे आहे. या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश वरपूडकर यांच्याकडे ५ लाख ९ हजार ४७९ रुपयांची रोकड आहे. सोने-चांदी २ लाख ७० हजार रुपये आणि पतीकडे १६ लाख २० हजार रुपये आहेत. स्थावर मालमत्तेमध्ये वरपूडकर यांच्याकडे ३ कोटी ७० लाख रुपयांची मालमत्ता असून त्यांच्या पत्नीच्या नावे ४२ लाख ३६ हजार रुपयांची मालमत्ता आहे. निवासी इमारतीमध्ये त्यांच्याकडे २५ लाख ८१ हजार रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्यावर ३१ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज आहे. वरपूडकर यांचे बी.एस्सी. कृषी शिक्षण झाले आहे. या निवडणुकीतील मनसेचे उमेदवार हरिभाऊ लहाने यांच्याकडे ५० हजार रुपयांची रोख रक्कम असून ८ लाख ३६ हजार रुपयांचे वाहन आहे. तर सोने-चांदीच्या मूल्यवान वस्तू ९० हजार रुपयांच्या आहेत. ४५ लाख रुपयांची स्थावर मालत्ता आणि पत्नीच्या नावे ३३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर दोन कोटी ४५ लाख रुपयांची नितीन जिनिंग त्यांच्या नावे आहे. निवास इमारतीमध्ये पाच ठिकाणी मिळून ३९ लाख रुपयांची मालमत्ता आहे. जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून ३ कोटी २८ लाख ७५ हजार रुपयांची एकूण मालमत्ता आहे. त्यांचे शिक्षण बी.कॉम. पर्यंत झालेले आहे. सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांच्या निवडणूक शपथपत्रावरुन कोट्याधीश असल्याचे दिसून येऊ लागले आहे.
पाथरीतही प्रमुख उमेदवार कोट्यधीशच
By admin | Published: September 28, 2014 11:45 PM