छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे खा. इम्तियाज जलील व आमची वेगळी दोस्ती आहे. भाजपकडून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड असो किंवा इतर कुणीही आमचा उमेदवार असो. त्याला निवडून आणण्यासाठी आम्हाला खा. जलील यांना उभे करावेच लागते, असे विधान करून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप व एमआयएमच्या छुप्या मैत्रीवर शिक्कामोर्तब केले.ते सोमवारी दिशा समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. डॉ. कराड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छा व्यक्त केली त्यात वावगे काय आहे, उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करावीच लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे, इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत. भाजप उमेदवारीसाठी समिती आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आहे. उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार असल्याचे दानवे म्हणाले, राज्यात भाजपचे नुकसान होईल, असे बोलले जात आहे. या पोकळ बातम्या असल्याचे ते म्हणाले. मागणी व पुरवठ्यावर मालाच्या किमती कमी-जास्त होतात. त्याचा केंद्र सरकार अंदाज घेत असते. कांद्याबाबतच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असले तरी कधी न कधी ते होत असते. याचा अर्थ मी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असे नाही. ग्राहक व शेतकऱ्यांचे हित पाहिले पाहिजे, असे दानवे म्हणाले.
दानवेंच्या विधानावर खा. जलील म्हणाले,दानवे यांना पत्रकारांनी विचारले की, खा. जलील हे पुन्हा निवडून येतील, त्यावर दानवे आधी जलीलच म्हणाले आम्ही पुन्हा येऊ. पुढे दानवे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत खा. जलील आम्हाला लागतील.
ते सगळे आमच्या ताटात जेवून गेलेले खरकटे...सहकारमंत्री दिलीप वळसे म्हणाले, खा. शरद पवारांच्या जिवावर राज्यात सरकार आलेले नाही. यावर बोलताना दानवे म्हणाले, मी अनेक वेळा सांगितले आहे, मायावती, जयललिता, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जीने स्वबळावर सरकार आणले. कोणत्याही प्रादेशिक पक्षाचे राज्यात स्वबळावर सरकार आलेले नाही. हे खरे आहे तसेच सहकार मंत्री वळसे जे बोलले ते देखील खरेच आहे. कुणाला तरी सोबत घेतल्याविना राज्यात सरकारच येत नाही. असे असताना आम्हाला सगळे जातीवादी ठरवतात. मायावती मुख्यमंत्री असताना भाजपचा उपमुख्यमंत्री होता. नितीशकुमार एनडीएमध्ये रेल्वेमंत्री होते. ओमर अब्दुल्ला, ममता बॅनर्जी अटल सरकारमध्ये होतेच ना. १९८५ मध्ये शरद पवार भाजप एकत्र निवडणूक लढले. हे सगळे आमच्या ताटात जेवून गेलेले खरकटे आहेत.