छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभेची जागा भाजपा लढणार की शिंदे गट यावरून मंगळवारचा दिवस चर्चेत राहिला. जागा शिंदे गटाला सुटल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत असले तरी भाजपाने अजून मैदान सोडलेले नाही. जागा मिळावी, यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
भाजपाचे राज्य समन्वयक आ. प्रसाद लाड यांच्या मुंबईतील निवासस्थानी मंगळवारी दुपारी संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांची व नेत्यांची बैठक झाली. या मतदारसंघात आजवर केलेल्या विविध सर्व्हेचे निष्कर्ष पाहता ही जागा भाजपने लढवावी, असा आग्रह धरण्यात आला. औरंगाबादच्या बदल्यात हिंगोलीची जागा शिंदे गटाला द्यावी, असेही सूचविण्यात आल्याचे समजते. मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगोली या तीन जागांचा तिढा कायम आहे. ठाणे, कल्याण-डोंबविली या जागांसाठी शिंदे गट आग्रही आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने औरंगाबादची जागा खूप महत्वाची आहे. आगामी विधानसभा, महापालिका निवडणुकांचा विचार करता, ही जागा शिंदे गटाला सोडण्यात येऊ नये, त्यासाठी पक्षश्रेष्ठींना विनंती करण्याचे या बैठकीत ठरल्याचे समजते.
जागेसाठी संघर्ष सुरूच....औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपाला का मिळावी, या अनुषंगाने वरिष्ठ पातळीपर्यंत बाजू लावून धरली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील नेते ही जागा भाजपाला सोडवून घेतील, असा विश्वास आहे. आम्ही अजून मैदान सोडलेले नाही. जागा आम्हालाच मिळणार आहे.- शिरीष बोराळकर, भाजपा शहराध्यक्ष