लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देव, देश आणि धर्म ही त्रिसूत्री पाळण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांची ही त्रिसूत्री असून, आमचे सरकारदेखील या त्रिसूत्रीप्रमाणेच काम करीत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. डॉ. नानासाहेब यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्वच्छता अभियानाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. मीदेखील धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कुटुंबाचा सदस्य आहे. माझ्या कुटुंबावर जेव्हा मोठी संकटं आली, त्यावेळी सगळं संपलं असं वाटलं; पण माझ्या पत्नीने प्रतिष्ठानच्या बैठकीचा मार्ग निवडला आणि आप्पासाहेबांच्या आशीर्वादाने सगळं निभावलं, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
छावणी परिषदेच्या मैदानावर शिस्तीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आ. संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, राहुल धर्माधिकारी, रमेश पवार आदींची उपस्थिती होती.
अंधश्रद्धेला थारा नकाे
अंधश्रद्धेला थारा न देता प्रत्येकाने पर्यावरण, आरोग्यासाठी काम करावे. मनातला अहंकार कमी झाला तरच माणूस कचऱ्यात हात घालतो. स्वच्छता ही कायम चालणारी प्रक्रिया आहे. - डाॅ. सचिन धर्माधिकारी
स्वच्छता महत्त्वाची
जी-२०च्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात परदेशी पाहुणे शहरात येणार आहेत. त्यामुळे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे, हे मी डॉक्टर असल्याने जाणतो. - डॉ. भागवत कराड
विदर्भाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे
विधानसभेचे अधिवेशन नागपुरात होत आहे, विदर्भाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर, मराठवाड्याच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे. मात्र, विरोधक गोंधळ करीत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. बिल्डरच्या मृत्यूची चौकशीची मागणी केली आहे. त्याबाबत माझ्यावर आरोप करणे केविलवाणा प्रयत्न असल्याचे शिंदे म्हणाले. एनआयटी जमीन प्रकरणी विरोधक तोंडघशी पडल्याचा दावा त्यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"