उस्मानाबाद : नगर पालिकेच्या पथकाने गुरूवारी रात्रीच्या सुमारास शहरातील खिणीमळा भागातील अवैध कत्तलखान्यावर धाड मारली़ यावेळी अडीच लाखाचे मांस व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी दोघांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शहरातील खिरणीमळा भागातील गौस शेख यांच्या जागेत अवैधरीत्या जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती नगर पालिकेला मिळाली होती़ या माहितीवरून गुरूवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुनील कांबळे व त्यांचे सहकारी उल्हास मुंडे, आकाश शिंगाडे, अजिंक्य जानराव आदींच्या पथकाने कारवाई केली़ शहर पोलीस ठाण्याचे सपोनि हणमंत उरलागोंडावर व कर्मचारीही उपस्थित होते़ यावेळी शौकत हमीद कुरेशी, सागर कबीर गायकवाड (दोघे रा़ खिरणीमळा उस्मानाबाद) या दोघांनी दोन जनावरे कापल्याचे आढळून आले़ पशुवैद्यकीय अधिकारी जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन मांसाचे तुकडे तपासणीसाठी ताब्यात घेतले़ याबाबत सुनिल कांबळे यांच्या फिर्यादीवरून शौकत कुरेशी व सागर गायकवाड या दोघाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील प्रकरणाचा अधिक तपास सपोनि हणमंत उरलागोंडावार हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)
कत्तलखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2017 12:44 AM