लातूर : लातूर तालुक्यातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबलने आपण आजारी असून, त्यासाठी रजेची मागणी वेळोवेळी सहाय्यक पोलिस निरीक्षकांकडे केली होती. मात्र रजा तर दिलीच नाही, उलट त्यांनी आपला मानसिक छळ केल्याचा आरोप ‘त्या’ महिलेने लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे. या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर लातुरातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.लातूर तालुक्यातील एका पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून ती महिला कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘त्या’ आजारी आहेत. आपल्याला आजारपणामुळे रजा हवी, असा अर्ज तेथील सहाय्यक पोलिस निरीक्षकांकडे केला होता. वेळोवेळी तशी तोंडीही मागणी त्यांनी केली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी रजा तर मिळणारच नाही, तुला कामावर यावेच लागेल, असा आदेश दिला. शेवटी आजार असहाय्य झाल्यामुळे, चक्कर येत असल्याने त्या महिलेने गुरुवारी आपले राहते घर गाठले. अशा परिस्थितीत ‘त्या’ सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी मोबाईलवरुन ‘तू पोलिस ठाण्यात का गेली नाहीस, पोलिस ठाण्यातच थांबले पाहिजे,’ असे म्हणत छळ केला. यादरम्यान आपल्याला चक्कर आली. अशा परिस्थितीत महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या पतीने वाहनातून लातुरात त्यांना उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे सध्या अतिदक्षता विभागात त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर उपचार सुरु आहेत.दरम्यान, सदर महिला कर्मचाऱ्याच्या पतीने वरिष्ठांच्या त्रासामुळे आपली पत्नी अत्यवस्थेत असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधिशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)‘त्या’ महिला पोलिस कॉन्स्टेबलने आपल्यावर होत असलेल्या मानसिक त्रासाबद्दल चिठ्ठी लिहून ठेवली आहे. चिठ्ठीत ही महिला म्हणते, साहेबांना समक्ष भेटून दोन दिवसांची रजा मागितली. पण त्यांनी ती नाकारली. त्याच दिवशी थंडी वाजत असल्याने व पोटात खूप दुखत असल्यामुळे मी घरी गेले. परंतु, साहेबांचा फोन आला. ‘तुम्ही ठाण्यात नाहीत का?, ठाण्यात का गेला नाहीत?’ मी त्यांना आजारी असल्याचे सांगितले. परंतु, त्यावर त्यांनी ड्युटीला यावे लागेल. ठाण्यात थांबावे लागेल, असेच म्हटले, असा मजकूर या चिठ्ठीत महिला पोलिस कॉन्स्टेबलने लिहिला आहे. सध्या ही महिला एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
आजाराने त्रस्त असताना महिला कॉन्स्टेबलला ‘ड्युटी’ची जबरदस्ती !
By admin | Published: October 28, 2015 11:39 PM