औरंगाबाद : विदेशातील संस्था, कंपन्या आऊटसोर्सिंगद्वारे भारतातील सीए (चार्टड अकाैंटटस्) कडून त्यांच्या व्यावसायिक खात्यांचे लेखापरीक्षण (ऑडिट) करुन घेत आहेत. भारतीय बुद्धिमत्ता आणि कौशल्याचे आणखी एक उदाहरण पुढे आल्याने रोजगाराचे अनेक संधी उपलब्ध होत आहेत.
भारतातील सीएकडून लेखापरीक्षण करून घेणे आर्थिकदृष्ट्या विदेशातील कंपन्यांना परवडत आहे तसेच गुणवत्तापूर्ण व अचूक काम तेही वेळेत करून देण्याचे कौशल्य आपल्या देशातील सीएमध्ये आहे. येथे डेटा सुरक्षित राहतो, माहिती लिक होत नाही. त्यामुळे देशातील सीएंना भविष्यात मोठी संधी उपलब्ध होणार असल्याने सीएने जागतिक संधीसाठी तयार राहावे, असे आवाहन आईसीएआयच्या डब्लूआरसीचे अध्यक्ष सीए मुर्तूजा काचवाला यांनी दिली.
आईसीएआयची औरंगाबाद शाखा आणि विकासातर्फे बुधवारी आयोजित कार्यक्रमात डब्लूआरसी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत अध्यक्ष मुर्तूजा काचवाला यांनी सांगितले की, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाैंटंट च्यावतीने घेण्यात येणारी सीएची परीक्षा सर्वांत कठीण आहे. येथील सीएंना जगभरात मागणी आहे. जर देशातील सीएला विदेशात प्रॅक्टिस करायची असेल तर तिथे एक परीक्षा द्यावी लागते. ‘वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाैंटटस्’ ही परिषद मुंबईत १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान भरविण्यात येणार आहे. देशातील सीएंसाठी ही मोठी संधी असणार आहे. यावेळी केंद्रीय परिषद सदस्य सीए उमेश शर्मा, डब्लूआरसीचे उपाध्यक्ष सीए यशवंत कासार, कोषाध्यक्ष सीए पीयूष चांडक, के यांची प्रमुख उपस्थिती होती.