- दुलारी कुरेशी ( ( विख्यात इतिहासतज्ज्ञ) )
अजिंठ्याच्या त्या अंधुक गुहेत प्रवेश करताच असा आभास होतो की, एक रंगीत स्वप्न सृष्टीसमोर तरंगायला लागले आहे. जसजसे बघणाऱ्यांचे डोळे चौफेर फिरायला लागतात तसतसे जणू रंगभूमीवर अनेक दृश्ये आपल्यासमोर सरकत जातात. जसे एखाद्या नाटकाचाच प्रयोग सुरू आहे, म्हणूनच की काय सुप्रसिद्ध शायर सिकंदर अली वज्द यांनी त्यांची प्रसिद्ध कविता ‘अजिंठा’ यामध्ये लिहिले आहे.
‘जहाँ नगमे जनम लेते है रंगीनी बरसती है,दख्खन की गोद में आबाहा ये खाबो की वस्ती हैये तस्वीरे बजाहेर साकेत व खामोश रहती है.मगर अहले नजर पूछे तो दिल की बात कहती है’
सिकंदर वज्द या चित्रकलेने अतिशय प्रभावित झाले होते. या जादूच्या ब्रशमधून निर्माण झाले मनुष्य, प्राणी, वनस्पती, इमारती इत्यादी. या विलक्षण आकृत्यांमध्ये मनुष्य हा केंद्रबिंदू राहिला. मग तो काळा, गोरा, गहूवर्णीय, तपकिरी किंवा भुरा असो. चित्रकारांनी या मनुष्याला समकालीन वेशभूषा, केशभूषा व अलंकारांनी सजवले. त्यांच्या सामर्थ्यशाली व विशिष्ट शैलीमुळे येथील पात्रांची ओळख सहजपणे उमजत नाही.येथील रंगचित्रामध्ये सगळ्यात लक्षवेधक पात्र जे ठरले ते म्हणजे अनेक विदेशी दिसणारे व्यक्ती. ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही दिसतात; पण अधिक मोठा टक्का पुरुषांचा आहे.
याची सखोल माहिती मिळविण्यासाठी अनेक पुस्तकांचे अवलंबन केले; परंतु मोजक्याच पुस्तकांमध्ये सविस्तर माहिती होती. यामध्ये गुलाम याजदानी यांचे अजिंठ्यावरचे चार व्हॉल्यूम, जॉन ग्रिफीतचे पुस्तक ‘द पेन्टिंग इन द बुद्धिस्ट टेम्पल आॅफ अजिंठा’, रमेश गुप्ते, ‘द आकानोग्राफी आॅफ बुद्धिस्ट स्कल्पचर;’ पण सगळ्यात महत्त्वाचा संशोधन लेख बहादूर राय रजेंद्रबाला मित्रांच्या ‘आॅन रिप्रेजेन्टेशन आॅफ फॉरिनर्ज इन द अजिंठा फ्रेस्कोज’ व वासुदेव अग्रवालाज, हर्षचरित एक सांस्कृतिक अध्ययन ठरले. या पुस्तकांनी हळूहळू अजिंठ्यातील परदेशी लोकांचा गुंतागुंतीचा प्रश्न उलगडण्यास बरीच मदत केली. तरी यामध्ये बऱ्याच चुकाही सापडल्या; परंतु महत्त्वाचे प्रश्न निश्चित उलगडले, ज्यामध्ये परदेशी लोकांची अजिंठ्यामध्ये उपस्थिती.
या भागातले सातावाहनांचे राज्य म्हणजे पैठण हे होते. सातवाहन काळ हा एक सुवर्णयुग म्हटला तरी चालेल. कारण यांच्या काळात शेती उत्पन्नाहून भरपूर महसूल मिळायचा, तसेच अनेक उद्योग होते (ज्याला अंतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी होती) येथील उद्योगांचे केंद्रस्थान म्हणजे पैठण, तेर व भोकरदन जेथे अनेक वस्तूंचे उत्पादन व्हायचे (ज्यामध्ये अनेक प्रकारचा कपडा, सुती, मलमल, रेशीम तसेच अनेक प्रकारचे मणी ज्यामध्ये हस्तिदंत, शंख, टेराकोटा, टेराकोटा तसेच अर्धमौल्यवान व मौल्यवान दगड) या वस्तूंची आयात-निर्यात व्हायची. पुढे वाकाटक व चालुक्यांच्या काळात हा व्यापारांचा विस्तार होऊन भरभराटीला आला. जेव्हा कोणाचेही राज्य वेगवान प्रगती करतो तेव्हा कलेला (मग ती चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला असो) उत्तेजन मिळते. कारण या सगळ्या अनुकूल परिस्थितीचा प्रभाव कलेवर निश्चितच पडतो आणि याच काळात अजिंठा, वेरूळ, घटोत्कच, औरंगाबाद, पितळखोरा या लेण्यांचेही उत्खनन झाले. या सगळ्या लेण्यांमध्ये अर्थात अजिंठा लेण्या या सर्वश्रेष्ठ ठरल्या.
पुस्तकांच्या माहितीप्रमाणे हे तर स्पष्ट झाले की, कोणकोणत्या देशांचे लोक व्यापार करायला पैठण व त्याच्या भोवतालच्या प्रांतामध्ये यायचे. एम.एन. देशपांडे यांच्या एका लेखामध्ये त्यांनी तेरला रोमन व्यापाऱ्यांची वसाहत होती असा उल्लेख केला. तसेच अरब व ग्रीक व्यापाऱ्यांचाही उल्लेख केला आहे, तसेच इराणी व्यापारी पण यायचे. या विदेशी व्यापाऱ्यांचा अजिंठ्यामधील रंगचित्रामध्ये उपस्थिती दिसते. अजिंठ्याच्या लेणी नंबर एक व सतरामध्ये जास्त संख्येनी विदेशी दिसतात. लेणी नंबर एकमध्ये एक प्रसिद्ध दृश्य म्हणजे एशियन एम्बेसी. या दृश्यामध्ये एका राजाच्या (पुलीकेसन दुसरा) अनेक दास, दासी, मंत्री इत्यादी उभे आहेत. राजाच्या समोर तीन विदेशी दिसत आहेत. त्यांनी टोकदार टोप्या घातल्या आहेत व तिघांनी दाढीला पण टोकदार आकार दिला आहे, तसेच त्यांच्या नाकाच्या व चेहऱ्याच्या ठेवणीवरून ते पर्शियनच असावेत. त्यांच्या नमुनेदार नोकदार टोपीवरून तर हे पर्शियन आहेत, तसेच त्यांच्या वेशभूषेला काबा म्हणतात. जो साधारणपणे घट्ट असतो. हा काबा त्यांच्या गुडघ्यापर्यंत आहे व त्याच्या खाली घट्टी चुडीदार घातला आहे.
अजिंठा लेणी नंबर एकच्या छतावर एक विदेशी राजाचे कोर्टमधील दृश्य आहे. ज्याला याजदानी यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये यांना पर्शियन म्हटले आहे. जे त्या काळी (आधुनिक अफगाणिस्थान)चा भाग होता. या दृश्यामध्ये दोघे राजा व राणी सिंहासनावर बसले आहेत व त्यांच्या दोनही बाजूला दाशा दिसत आहेत. त्यांचे कपडे थंडीच्या भागातल्या आवश्यकतेप्रमाणे आहेत. येथे स्त्रियांनी लांब झगा घातला आहे व राजाने पण कशिदा काम केलेला जामा घातला व त्याच्याखाली चुडीदार. येथे दोन्ही बाजूस उभ्या असलेल्या दासी हे राजा व राणीला मदिरा सर्व्ह करीत आहेत. त्यांच्या हातात अतिशय सुंदर सुरई दिसत आहे. त्याने डोक्यावर घट्ट बसणाऱ्या टोप्या घातल्या आहेत.लेणी नंबर सतरामध्ये विश्वंतरा जातकामध्ये एका दृश्यामध्ये तीन दाशा बसल्या. ज्यामध्ये एकीच्या चेहऱ्याची ठेवण आफ्रिकी भागातील आहे. हिचे नाक थोडे चपटे आहे, तर ओठ जाड आहेत. ही दासी एबिसिनियाची वाटते. (आधुनिक इथोपिया) पूर्वीच्या काळात अनेक गुलाम एबिसिनियाहून आणून गुलामांच्या बाजारपेठत विकत असत. भारतीय राजघराण्यात पण अनेक गुलाम विकत घेऊन राजदरबाराच्या सेवेत ठेवत असत.
अजिंठ्याचे सगळ्यात प्रसिद्धदृश्य म्हणजे ‘बुद्धाचे दुशीता स्वर्गात प्रवचन’ या प्रवचनामध्ये अनेक वेगवेगळे लोक दिसतात. ज्यामध्ये अनेक परदेशी हे प्रवचन मोठ्या तन्मयतेने व शांतपणे ऐकत आहेत. येथील विदेशी सैन्यातील लोक हत्तीवर, घोड्यावर बसून प्रवचन ऐकत आहेत. त्यांची दाढी वाढलेली दिसते, तसेच मिशी पण कापून आकारात ठेवलेली दिसते. काहींनी टोप्या घातल्या आहेत व कशिदा केलेला जामा घातलेला आहे व केस कुरळे दिसतात. हे लोक अफगाणिस्तानाचा गंधारा नावाच्या भागातून आलेले दिसतात. या भागातील अनेकांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता. तसेच अजिंठ्याचा रंगचित्रामध्ये अनेक इराणी, मंगोल, ग्रीक व रोमन व्यक्ती पण दिसतात. येथे अनेक विदेशी विनोदी अवस्थेमध्ये दिसतात. डोळे मिचकवताना, गाळ फुगवताना किंवा एकमेकांची चेष्टा करताना अजिंठ्याची ही रंगीत दुनिया अतिशय समृद्ध आहे. येथे जो उलगडा पुस्तकामध्ये होत नाही तो अजिंठ्याच्या चित्रांमध्ये जास्त स्पष्ट होतो. म्हणूनच अजिंठ्यामधील विदेशींची एक वेगळीच दुनिया आहे. येथे परत परत जावेसे वाटते. कारण प्रत्येक वेळेस काही तरी नवीनच दिसते. मराठवाड्यातील संशोधकांकरिता हा एक अमूल्य ठेवा आहे आणि याच्या वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करणे गरजेचे आहे.