फुलंब्री : तालुक्यातील निधोना हद्दीतील जंगलाला आग लागून आठ दिवस झाले. पण एकही अधिकारी त्याकडे फिरकला नसल्याने दोन हरणाचा होरपळून मृत्यू झाला तर २४ हेक्टर क्षेत्रातील झाडे जळून खाक झाली आहेत. मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत असतानासुद्धा जबाबदार अधिकारी, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थिती आहे.
फुलंब्री तालुक्यातील निधोना व कन्नड तालुक्यातील दरेगाव या दोन गावांच्या मध्यभागी असलेल्या गट २६० मध्ये वनविभागाचे ५७ हेक्टर क्षेत्रात जंगल आहे. या जंगलात नीलगाय, हरीण, रानडुक्कर आदी प्राणी असून जंगलाचा काही भाग डोंगरावर तर काही सपाट जमिनीवर आहे. निधोना परिसरातील ५७ हेक्टरपैकी सुमारे २४ हेक्टर क्षेत्रातील जंगलाला १ मेपासून आग लागलेली असून ती ७ मेपर्यंत सुरूच आहे. मात्र, वनविभागाचे अधिकारी कुंभकर्ण झोपेत असून वनसंपदा नष्ट होत असताना ते याकडे कानाडोळा करत आहेत. या आगीमुळे जंगलातील दोन हरिणीचा होरपळून मृत्यू झाला असून कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले आहे. जंगलातील आग परिसरात पसरत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या आगीत हरिदास राऊतराय, देवीदास राऊतराय, गंगाराम सोनवणे, रंगनाथ सोनवणे यांच्या शेतातील आंब्याची झाडे, मक्काचा चारा, प्लास्टिकचे पाईप जळाले आहेत.
---- कोट ------
निधोना हद्दीतील वन विभागाच्या या जंगलाला गेल्या आठ दिवसांपासून आग लागलेली आहे. यामुळे अनेक वन्यप्राणी आपला जीव वाचविण्यासाठी बाहेर पडले. परंतु, जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे वनसंपदा नष्ट होत आहे.
-- बिजूबाई राऊतराय, सरपंच निधोना
----- कॅप्शन : निधोना परिसरातील जंगलास लागलेल्या आगीत वनसंपदा अशी नष्ट होत आहे.