औरंगाबाद: आपतकालीन प्रसंगाला तोंड देण्यासाठी वन विभागाकडे आधुनिक साधनेच नाहीत. सातारा डोंगरावर लागलेली आग विझवतांना वन विभागाला कराव्या लागलेल्या कसरतीमधून हे विदारक सत्य समोर आले. सायंकाळी लागलेली आग आग्निशामक विभाग तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रमाने जुन्याच पद्धतीने पहाटे पहाटे आटोक्यात आणली.
एकीकडे झाडे लावा झाडे जगवा, असा नारा द्यायचा आणि आपतकाली आवश्यक आधुनिक साधने मात्र उपलब्ध करून दिली जात नाहीत. सातारा, देवळाई, जटवाडा, माळीवाडा तसेच जिल्हाभरातील विविध ठिकाणी जंगलाला जानेवारी ते मार्चच्या दरम्यान आग लागण्याचे प्रकार घडतात. त्यावेळी वन कर्मचारी, अधिकारी झाडाच्या फांद्यांने किंवा जुन्याच पद्धतीने आगीवर तुटुन पडतात. डोंगरातील वनराई वाचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान असलेली कोणतीही साधणे वन विभागाकडेही नाही आणि अग्निशामक विभागाकडेही नाही. बुट तसेच इतर सुरक्षेचे कोणतेही साधण नसल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागले. औरंगाबाद शेजारी उजाड असलेली डोंगर हळुहळु वनराईने हिरवीगार दिसत आहेत. त्यामुळे अन्नसाखळी पूर्ण होत असल्याने येथे मोर, तितर, चिमण्या, साळुंकी तसेच हरिण, रानडुक्कर, तडस, बिबटे इतर पशु पक्षी विहार करत आहेत. आगीमुळे सरपटणाऱ्या प्राण्यापासून ते पशु पक्षांना फटका बसला आहे. त्यांची घरटी आगीत भष्मसात झाली. आधुनिक साधणे विभागाकडे उपलब्ध असती तर रात्रभर प्रयत्नाऐवजी लवकर आगीवर नियंत्रण मिळविता आले असते.
जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी
शासनाने जंगल वाचविण्यासाठी आधुनिक साधणे उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे पत्र नुकतेच शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी यांना दिले आहे.- डॉ. किशोर पाठक (निसर्ग प्रेमी)
फायर फट्टे व साधणाचा पाठविला प्रस्ताव
झुंज देण्यासाठी फायर फट्टे तसेच नव-नवीन साधणे उपलब्ध करून द्यावी. अग्निशामक विभागाकडे अधिक लांबीचा पाईप उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. - शशिकांत तांबे (वन परिक्षेत्र अधिकारी)