फुलंब्री : तालुक्यात असलेल्या जंगलाला आग लागते, की लावली जाते हे एक न उलगडणारे कोडे आहे. वनविभागालाही याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. पण अशा प्रकारामुळे मात्र जंगल संपदा नष्ट होताना दिसून येत आहे. निधोना परिसरातील जंगलाला आठ वर्षात तब्बल पाच वेळा आग लागल्याचे समोर आले आहे.
औरंगाबाद वनविभागाचे सिल्लोड व फुलंब्री ही दोन तालुके मिळून एक उपविभागीय कार्यालय सिल्लोड येथे स्थापित आहे. फुलंबी तालुक्यातील वनविभागाची ३,९०० हेक्टर जमिनीची देखभाल करण्याची जबाबदारी सिल्लोड विभागाची आहे. यात निधोना परिसरातील ५७ हेक्टर वनजमिनीचा ताबा हा सोयगाव विभागाकडे आहे. मात्र, या विभागाचे निधोना शिवाराकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी निधोन्याचे ५७ हेक्टर जंगल केवळ नावालाच उरले आहे. वनविभागाकडून दरवर्षी देखाव्यापुरती वृक्षलागवड केली जाते. पण त्याच्या संवर्धनाची जबाबदारी मात्र कोणीच घेत नाही. परिणामी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमाला हरताळ फासला जात आहे. त्यात स्थानिक पातळीवरदेखील नागरिकांसह विभागाकडून दुर्लक्ष केले जाते.
वनविभागाचा तुघलकी निर्णय
फुलंब्री तालुक्यात जंगल असताना यांचा कारभार सिल्लोड किंवा औरंगाबाद विभागाकडे देण्याऐवजी तो सोयगाव विभागाला का जोडला गेला. एक प्रकारे वनविभागाचा हा निर्णय तुघलकी म्हणावा लागेल. ज्यांना देखरेख करण्यास सोयीचे पडेल अशा कार्यालयाकडे अधिकार नसल्याने येथील वनसंपदेकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे.
नुसताच चौकशींचा फार्स
वनविभागाच्या जंगलाला नेहमीच आग लागते. ही आग लावली जाते की अचानक लागते. यावर अनेकवेळा वनविभागाकडून चौकशीचा फार्स लावला जातो. पण अद्यापपर्यंत कोणतेही ठोस उत्तर सापडले नाही. आगीसंदर्भातील हा गहन प्रश्न असून, हे कायमस्वरूपी न उलगडणारे कोडे आहे. त्यात आग लागली नाही तर दरवर्षी वृक्षलागवडीसाठी लागणारी बिले कशी निघतील, असा प्रश्नही काही पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.
वन्यप्राणी निघतात पाण्याच्या शोधात
निधोना परिसरातील जंगलात नीलगाय, हरीण, रानडुकर, सायाळ या वन्यप्राण्यांचा समावेश आहे. या जंगलातील पाणवठ्यात पाणी टाकले जात नसल्याने हे प्राणी जंगलाबाहेर पडू लागतात. पाण्याच्या शोधात वाडीवस्तीवर जातात. परिणामी नागरिकांकडून भीतीपोटी वन्यप्राण्यांवर हल्ला केला जातो. त्यामुळे वन्यप्राणीदेखील संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे.