नांदेड : किनवट तालुक्यातील सागवान तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या चिखली गावात सागवान तस्कारांचा पाठलाग करीत पोहोंचलेल्या वनपालाला सागवान तस्कारांनी बेदम मारहाण केली़ त्याचबरोबरच महिला कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली़
१५ डिसेंबर रोजी बोधडी वनपरिक्षेत्राचे वनपाल बाबु तुकाराम जाधव हे इतर कर्मचाऱ्यांसह गस्तीवर होते़ त्याचवेळी त्यांना वनसर्वे क्रं़३० मध्ये सागवान लाकडे चोरीस जात असल्याचे आढळून आले़ ही सागवानाची लाकडे बैलगाडीत भरुन चिखलीकडे निघाली होती़ त्यानंतर जाधव यांनी इतर कर्मचाऱ्यांसह पाठलाग करुन बैलगाडी अडवली़ यावेळी आरोपींनी आरडाओरड करत गावातील इतर मंडळींना बोलावून घेतले़ त्यानंतर जाधव यांच्यासह महिला कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली़ तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली़ या प्रकरणी बाबु जाधव यांच्या तक्रारीवरुन किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ दरम्यान सागवान तस्करीसाठी चिखली हे गाव कुप्रसिद्ध असून यापुर्वीही वनविभागाने या गावात अनेकवेळा धाडी मारुन सागवान जप्त केले होते़