औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेल्या 'वनधना'ची दुकाने पुन्हा बहरणार असून, दुर्मीळ ‘वनधन’ शहरवासीयांना मिळणार आहे. वनातील मध, डिंक, बिब्याच्या गोडंबीसह ‘वनधन’ रानभाज्याही शहरवासीयांना चाखता येणार आहेत. आरोग्यदायी ‘वनधन’ आणि रानभाज्या आता १२ महिने उपलब्ध होणार आहेत.
वन विभागाने ग्रामीण आणि वनक्षेत्रातील बचत गटाच्या हाताला काम, तसेच त्यांच्या श्रमाला मोल मिळावे यासाठी एका छताखाली हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला होता. लॉकडाऊनच्या काळात तो बंद पडला. त्यामुळे या दुकानाला टाळे लागले आणि शहरवासीयांची मोठी निराशा झाली होती.
कन्नड येथील बचत गटाला वन विभागाने दुकान उपलब्ध करून दिले. त्या दुकानाची सफाई तसेच पंचनामा करून ते ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या दसरा, दिवाळीत, तसेच एरव्ही बारा महिने वनधन उपलब्ध व्हावे, अशी शहरवासीयांचीही मोठी मागणी असल्याने बंद पडलेला उपक्रम सुरू होत आहे. वन क्षेत्रातील बचत गटाच्या महिलांना या उपक्रमाचा फायदाच होणार आहे. लवकरच शहरवासीयांना ‘वनधन’ मिळेल, असे वन परिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांनी सांगितले.
रानभाज्या औषधी गुणधर्म असून, त्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. भाजी मंडईत कधी तरी उपलब्ध होतात. त्या कधी तरी आणल्यावर बनवायच्या कशा, याविषयी अनेक नव्या पिढीला माहीत नसते. त्यावरही येथे माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हिवाळ्यात आवर्जून प्रत्येक घरात काही विशिष्ट आरोग्यदायी खाद्यपदार्थ बनविले जातात. परंतु त्यासाठी लागणारे साहित्य हे पूर्णत: दर्जेदार व शुद्ध मिळेलच, याची हमी नसते. ते येथे मिळेल. यासोबतच खेड्यातील आणि वनक्षेत्रालगतच्या महिलांनाही शहरात बाजारपेठ मिळवून देण्याचा वनविभागाचा हा उपक्रम पुन्हा सुरू होत आहे.