औरंगाबाद : मराठवाडा इको बटालियची स्थापना होऊन चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षांत इको बटालियनने आतापर्यंत ७६४ हेक्टर जमिनीत ६ लाख ७६ हजार ५५८ वृक्षांची लागवड केली आहे. हे काम पुढे घेऊन जाण्यासाठी सिरसमल गावातील वनविभागाच्या १५० हेक्टर जमिनीवर वनराई करण्याचा निर्णय इको बटालियनने घेतला आहे. वन विभाग आणि बटालियनच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या जमिनीची पाहणी केली.
वन विभागाच्या जमिनीवर सिरसमल गावच्या काही नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून आले होते. तेव्हा गावकऱ्यांना त्यांच्या जमिनीची कागदपत्रे घेऊन कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना वन विभाग आणि इको बटालियनच्या अधिकाऱ्यांनी केल्या होत्या. मात्र, एकही शेतकरी कागदपत्रे घेऊन आला नाही, असे इको बटालियनने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. इको बटालियनचे कमांड अधिकारी कर्नल एम.ए. खान, प्रकल्प अधिकारी लेफ्टनंट कर्नल मिथिल एस. जयकर, कॅप्टन मेहता हीत आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जमिनीची नुकतीच पाहणी केली. या जमिनीवर १ लाख ६० वृक्षांचे रोपण होऊ शकते. हे वृक्षारोपण करण्यास इको बटालियन तयार असल्याचेही त्यांनी कळविले आहे. मात्र, या जमिनीवर काही जणांनी अतिक्रमण केले आहे. याविषयीचे पुरावे शेतकऱ्यांना मागण्यात आले होते. त्यांनी ते दिले नाहीत. वन विभागाची ही जमिनी इको बटालियनला देण्यात येणार आहे. त्यानुसार इको बटालियन लवकरच त्यावर वृक्षारोपण करणार असल्याचेही कळविले आहे.
चौकट
गावकऱ्यांशी चर्चा
इको बटालियनचे कमांड अधिकारी कर्नल एम.ए. खान यांनी सिरसमल गावातील नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या, तसेच वन विभागाच्या जमिनीवर होणाऱ्या वृक्षारोपणात अधिकाधिक लोकोपयोगी वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचे सांगितले, तसेच गावातील शेतकरी वर्षात एकदाच पीक घेतात. त्यानंतर मजुरीसाठी इतर ठिकाणी जातात. त्यामुळे वृक्षारोपणासाठी लागणारे मनुष्यबळ हे गावातूनच उपलब्ध केले जाईल. त्यामुळे गावातील अनेकांना रोजगार उपलब्ध होईल, असेही कर्नल खान यांनी गावकऱ्यांना सांगितल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.