पैठण (औरंगाबाद ) : घरगुती मालमत्तेच्या वाटणीवरून मुलगा व सुनेने कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून गंभीर जखमी केलेल्या बापाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना पैठण तालुक्यातील बीडकीनपासून जवळ असलेल्या डोंगरू नाईक तांड्यावर घडली.
सुन व मुलाने जन्मदात्या पित्यास दि १६ रोजी जबर मारहाण केल्याने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राजू भूरा चव्हाण (५०) यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी राजू चव्हाण यांची प्राणज्योत मावळली. या प्रकरणी पोलिसांनी मुलगा व सुनास ताब्यात घेतले आहे. राजू भुरा चव्हाण यांचा मुलगा मांगीलाल व सून कोमल यांच्यात मालमत्तेच्या कारणावरून दि.१६ नोव्हेंबर रोजी डोगरू तांडा येथे भांडण झाले होते. या भांडणात, मांगिलाल व त्याची पत्नी कोमल या दोघांनी राजू भुरा चव्हाण यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने जबर मारहाण केली होती. गंभीर जखमी राजू भुरा चव्हाण यांच्यावर बिडकीन येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, राजू भुरा चव्हाण याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मावळली.याप्रकरणी, राजू भुरा चव्हाण यांची दुसरी सून अश्विनी कैलास चव्हाण यांच्या तक्रारीवरून बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलगा मांगीलाल राजू चव्हाण व सून कोमल मागिलाल चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बिडकीन चे सपोनि संतोष माने व सहायक फौजदार जगदीश मोरे, छोटुसिंग गिरासे, बापू दंडगव्हाळ आदी करत आहे.