छत्रपती संभाजीनगर : रोटेगाव-पुणतांबा हा २७ किलोमीटरचा प्रस्तावित रेल्वेमार्ग आता विसरूनच जा, असेच म्हणण्याची वेळ येत आहे. तर या रेल्वे मार्गाला पर्याय म्हणून मांडलेला रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्गही कागदावरच आहे. त्यामुळेच मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अवघ्या काही अंतरासाठी मनमाडमार्गे १२६ किलोमीटर अंतर प्रवास करून पुणतांबा, शिर्डी गाठावे लागते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी देशभरातील ५५४ अमृत स्टेशन आणि १,५०० उड्डाण पूल , भुयारी पुलांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण सोहळा होणार आहे. यामध्ये ‘दमरे’च्या नांदेड विभागातील भोकर, हिमायतनगर, मानवत रोड आणि रोटेगाव रेल्वेस्थानकासह ४८ भुयारी मार्ग, तसेच उड्डाणपुलांचा समावेश आहे. रोटेगाव रेल्वेस्टेशनचा पुनर्विकास होत आहे. मात्र, कागदावरील रेल्वे मार्गांचे काय, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.
मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या रोटेगाव-पुणतांबा या रेल्वेमार्गासाठी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ, दिवंगत कामगार नेते विजयेंद्र काबरा, शालिग्राम बसैये, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनीही प्रयत्न केले. आजघडीला पुणतांबा, शिर्डीसाठी मनमाडमार्गे जावे लागते. त्यामुळे रोटेगाव ते पुणतांबा हे अंतर १२६ किलोमीटर पडते. त्यामुळे हा प्रवास करताना अधिक वेळ लागतो. त्यामुळे रोटेगाव-पुणतांबा हा २७ किलोमीटरचा रेल्वेमार्ग करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या २५ वर्षांपासून मागणी होत असलेल्या या रेल्वे मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे हा रेल्वे मार्ग तयार करणे रेल्वेसाठी खर्चीक ठरत आहे. यावर पर्याय म्हणून काही वर्षांपूर्वी रोटेगाव-कोपरगाव असा ३५ किलोमीटरचा कॉडलाइनचा पर्याय मांडण्यात आला. या पर्यायी मार्गामुळे रोटेगाव ते पुणतांबा हे अंतर ६९ किलोमीटरने कमी होणार आहे. या नव्या पर्यायाचा प्रस्ताव रेल्वेला पाठविण्यातही आला; परंतु अजूनही हे दोन्ही मार्ग कागदावरच आहेत.
२००९ मध्ये सर्वेक्षणरेल्वे प्रवाशांना मनमाडचा फेरा होऊ नये, या फेऱ्यामुळे लागणारे अधिकचे डिझेल वाचावे व प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी रोटेगाव-पुणतांबा या रेल्वे मार्गाची मागणी करण्यात आली. संघटनांच्या पाठपुराव्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण २१ सप्टेंबर २००९ ला पूर्ण करण्यात आले. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ९७ कोटी होती. त्यानंतरही वेळोवेळी रेल्वे प्रशासनाने सर्वेक्षण, पाहणी केली.