छत्रपती संभाजीनगर : ‘तुमचा छळ करणाऱ्यांना क्षमा करा!’ हा शत्रूवर प्रेम करण्याचा संदेश प्रभू येशूने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी ‘उत्तम शुक्रवार’ (गुड फ्रायडे)च्या दिवशी वधस्तंभावरून आपल्या कृतीद्वारे जगाला दिला. त्याचा अंगीकार केल्यास जगात बंधुत्व, प्रीती आणि शांतता नांदेल, असा संदेश रेव्ह. सुशील वाय. घुले यांनी उत्तम शुक्रवारच्या (गुड फ्रायडे) विशेष भक्तीप्रसंगी क्राइस्ट चर्च येथे दिला.
हाता-पायात ठोकलेले खिळे, पोटात भोसकलेला भाला व डोक्यावर काट्यांचा मुकुट, रक्तबंबाळ झालेले संपूर्ण शरीर आणि त्यामुळे होणाऱ्या प्रचंड वेदना तरीही येशू म्हणतो “हे बापा, यांना क्षमा कर! कारण, हे काय करतात, यांना समजत नाही.” वधस्तंभावरील या एका वाक्याने येशूने ‘क्षमा करण्यामधील’ ताकद जगाला प्रदान केली, असे वर्णन करून रेव्ह. घुले यांनी भाविकांसमोर तो प्रसंग उभा केला.
येशूने वधस्तंभावरून उच्चारलेल्या सात उद्गारांच्या (वाक्याच्या) शास्त्रपाठाचे वाचन प्रशांत तिडके, कल्पना घुले, शामला शिंदे, बिपीन इंगल्स, डेनिस नेल्सन, स्मिथ ऑलिव्हर, कविता मंडलिक, जस्टीन खेत्रे, सिरील श्रीसुंदर आणि संजीवनी पाटोळे यांनी केले. तद्नंतर रेव्ह. घुले यांनी प्रत्येक शब्दाचा मथितार्थ विशद करून सद्य:स्थितीत त्यांचे अगत्य सांगितले. दानार्पणाची प्रार्थना महेश श्रीसुंदर यांनी केली. भक्तीचे संचालन सचिव जेम्स अंबिलढगे यांनी केले.
सर्वपंथीय चर्चमध्ये विशेष भक्तीशहर, छावणी, भावसिंगपुरा, सिडको आणि ग्रामीण भागातील सर्वपंथीय ख्रिस्ती धर्मगुरूंनी आपापल्या चर्चमधून ‘गुड फ्रायडे’चा विशेष संदेश दिला. कॅथॉलिक पंथीय चर्चतर्फे ‘गुड फ्रायडेचा संदेश व क्रुसाची वाट’ या पारंपरिक विधीद्वारे येशूच्या वधस्तंभ स्थळापर्यंतच्या यातनामय प्रवासाची पुनरावृत्ती करून जगाच्या उद्धारासाठी येशूने केलेल्या बलिदानाची अनुभूती भक्तांना करविली गेली. सर्वच चर्चमध्ये भाविक मोठ्या संख्येने भक्तीमध्ये सहभागी झाले.
येशूच्या वधस्तंभावरील या सात उद्गारांचा (वाक्यांचा) मथितार्थ धर्मगुरूंनी विशद केला१. हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात, हे त्यांना समजत नाही.२. मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील.३. बाई पाहा, हा तुझा पुत्र, पाहा ही तुझी आई४. माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?५. मला तहान लागली आहे.६. पूर्ण झाले आहे.७. हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.