औरंगाबाद : बीड बायपासवरील अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घातली. तरीही अपघात घडले. यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी, शैक्षणिक संस्थांनी उपाय सुचवावेत, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करून शून्य अपघात धोरणासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले.आरटीओ कार्यालयातर्फे आयोजित राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी छत्रपती शाहू महाराज शिक्षणसंस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महापौर नंदकुमार घोडेले अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता के. टी. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, ‘सीएसएमएसएस’चे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, डॉ. डी. के. शेळके, डॉ. जी. बी. डोंगरे, अशोक आहेर यांची उपस्थिती होती.यावेळी चिरंजीव प्रसाद म्हणाले, नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याने परदेशात अपघातांचे प्रमाण कमी आहे. याच सहकार्याची अपेक्षा आपल्याकडेही आहे. महामार्गावर अधिक गतिरोधक टाकता येत नाही. परंतु बीड बायपास जवळजवळ शहरात आला आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी काही पर्याय करावे लागतील. ध्वनिक्षेपकावरून सूचना, बॅरिकेटस् टाकून वाहनांची गती कमी करता येईल. अपघात कमी करण्यासाठी पुरेशा विश्रांतीबरोबर वाहनांची गती कमी ठेवली पाहिजे. ४० कि.मी. गतीचे बंधन केले आहे. ५० कि.मी.च्या वर गती गेल्यास कारवाई केली जाईल. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळाले पाहिजे. बीड बायपास परिसरातील कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि नागरिकांनी समितीच्या माध्यमातून अपघात कमी करण्यासाठी उपाय सांगावेत. त्याची आठवडाभरात अंमलबजावणी केली जाईल.महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, माझ्या कर्मभूमीतील पैठण रोड मृत्यूचा सापळा झाला, याचा खेद वाटतो. बीड बायपास व पैठण रोडवरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. याप्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, श्रीकृष्ण नकाते, स्वप्नील माने, शैलेश लाहोटी, मोटार वाहन निरीक्षक धनंजय थोरे, रवींद्र यादव, एस. एस. सुत्रावे, मंगेश गुरव आदी उपस्थित होते. मोटार वाहन निरीक्षक शाहेद जमादार यांनी सूत्रसंचालन केले.रायडर फे्रंडली हेल्मेटहेल्मेटसंदर्भात तक्रारी केल्या जातात. परंतु रायडर फ्रेंडली हेल्मेट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही प्रवास टाळू शकता का, याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक देशांत आंतरराष्ट्रीय मानके आहेत. परदेशांत तुम्ही सलग चार तास वाहन चालविल्यानंतर वाहन सुरूच होत नाही. चालकाने तासभर विश्रांती घेतल्याशिवाय वाहन सुरूच होणार नाही, असे सॉफ्टवेअर, हार्डवेअर आहे, असेही पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले.
समिती स्थापन करून बीड बायपासवर शून्य अपघात धोरणासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 11:03 PM
बीड बायपासवरील अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घातली. तरीही अपघात घडले. यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी, शैक्षणिक संस्थांनी उपाय सुचवावेत, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करून शून्य अपघात धोरणासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले.
ठळक मुद्देपोलीस आयुक्त : राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी अपघातमुक्तीसाठी नागरिकांनी उपाय सुचविण्याचे आवाहन