औरंगाबाद : संस्थेच्या संचालक मंडळाचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना कथित अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांनी दिलेल्या नियुक्तीपत्राच्या आधारे एका महिलेला बनावट वैयक्तिक मान्यता आदेश देऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून वेदांतनगर पोलिसांनी माजी शिक्षणाधिकारी पी.बी. चव्हाण यांना गुरुवारी रात्री अटक केली. त्यांना न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
फुलंब्री येथील भारतमाता विद्यालय या माध्यमिक शाळेवर संस्थाध्यक्ष पद्माकर इंगळे, मुख्याध्यापक श्रीकृष्ण सांबरे यांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पी. बी. चव्हाण यांच्याशी संगनमत करून बनावट ठरावाच्या आधारे सविता उत्तमराव नंदावणे यांना शिक्षिकापदी नियुक्ती आदेश दिले. सन २०१० साली बनावट वैयक्तिक मान्यता आदेशही तयार करण्यात आला होता. संस्था सचिव मनोज मुळे यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी जानेवारी महिन्यात पद्माकर विनायक इंगळे, योगेश श्रीकृष्ण सांबरे आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी चव्हाण यांच्याविरुद्ध वेदांतनगर पोलिसांत गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी गत आठवड्यात पोलिसांनी आरोपी पद्माकर इंगळे याला अटक केली होती. या प्रकरणातील फरार आरोपी चव्हाण याला गुरुवारी रात्री पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी दिली.
२० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीआरोपी चव्हाणला पोलिसांनी शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल भदरगे तपास करीत आहेत.