कॉँग्रेसने औरंगाबाद पूर्वमधून दिला नवा चेहरा; माजी शिक्षणाधिकारी एम.के. देशमुखांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 12:38 PM2024-10-26T12:38:41+5:302024-10-26T12:44:41+5:30

विशेष म्हणजे, सेवानिवृत्ती कार्यक्रमात एम. के. देशमुख यांची लोकप्रियता पाहून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना राजकारणात येण्याचे निमंत्रण दिले होते.

Former Education Officer M. K. Deshmukh's second innings; Aurangabad East candidature from Congress | कॉँग्रेसने औरंगाबाद पूर्वमधून दिला नवा चेहरा; माजी शिक्षणाधिकारी एम.के. देशमुखांना उमेदवारी

कॉँग्रेसने औरंगाबाद पूर्वमधून दिला नवा चेहरा; माजी शिक्षणाधिकारी एम.के. देशमुखांना उमेदवारी

छत्रपती संभाजीनगर : माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख शिक्षणक्षेत्रानंतर आता राजकारणातील आपल्या दुसऱ्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. कॉँग्रेसच्या दुसऱ्या यादीत औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पूर्व मतदार संघात भाजपाचे मंत्री आणि तिसऱ्यावेळी उमेदवारी मिळालेले अतुल सावे, वंचितचे विकास रावसाहेब दांडगे यांच्या विरोधात देशमुख मैदानात उतरले आहेत. एमआयएमने येथून अद्याप आपला उमेदवार जाहीर केला नाही. पूर्व मतदारसंघात मागील दोन विधानसभेत अत्यंत चुरसीच्या लढतीत भाजपाच्या सावे यांनी बाजी मारली होती.

सेवानिवृत्ती कार्यक्रमात एम. के. देशमुख यांची लोकप्रियता पाहून सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना राजकारणात येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले तसे देशमुख यांनी 'बदल हवा, तर चेहरा नवा' असा नारा देत औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडणूक दावा दाखल केला. येथे मुस्लिम मते अधिक असल्याने कॉँग्रेसने यावेळी मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी जोर धरत होती. अखेर कॉँग्रेसने दुसऱ्या यादीत नवीन उमेदवार देत देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे, त्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात भाजपा मंत्री अतुल सावे देखील उपस्थित होते. त्यांनी देखील देशमुख यांना राजकारणात येण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आज सावे यांच्या विरोधातच देशमुख निवडणूक लढत आहेत. 

कोण आहेत एम. के. देशमुख?
गरिबीवर मात करत शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत एम. के. देशमुख यांनी सुरुवातीला एका दुर्गम खेड्यात शिक्षकाची केलेली नोकरी केली. त्यानंतर एमपीएससीच्या परीक्षांत सातत्याने यश मिळवत  देशमुख शिक्षणाधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगरमधून निवृत्त झाले. शिक्षण क्षेत्रात एक कर्तव्यदक्ष अधिकारी राहिलेले एम. के. देशमुख यांनी आपल्या कार्यशैलीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वांच्याच मनात घर केले. त्यांच्या सेवापूर्ती समारंभात मुंबईपासून नागपूरपर्यंत आणि नांदेडपासून नाशिकपर्यंत शिक्षण विभागातील आजी- माजी वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, संस्थाचालक एवढेच नव्हे, तर मंत्रालयातील अधिकारी, जिल्हा परिषदेचे आजी- माजी अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.

सर्वपक्षीय नेत्यांचे राजकारणात मदतीचे आश्वासन 
देशमुख यांच्या सेवापूर्ती समारंभात सर्वच राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. यात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी त्यांची लोकप्रियता पाहून सुरुवातीलाच ‘तुम्ही चिखली मतदारसंघातून घड्याळावर निवडणूक लढवा’, असे सूचवत छत्रपती संभाजीनगर विभागात स्पर्धक नको, अशी सावध भूमिका घेतली. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याण काळे यांनी हातावरच घड्याळ बांधावे लागते, तुम्ही या, सहकार्य करू’ अशी मिश्कील टिप्पणी केली. तत्पूर्वी, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खा. संदीपान भुमरे आणि हरिभाऊ बागडे यांनीही ‘राजकीय क्षेत्रात येत असाल, तर बिनशर्त सहकार्य करू,’ असा विश्वास दिला होता. आता खरोखरच देशमुख निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे कोणता नेता दिलेला शब्द पाळतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Web Title: Former Education Officer M. K. Deshmukh's second innings; Aurangabad East candidature from Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.