औरंगाबाद : रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील ग्रार्इंड मास्टर कंपनीचे तंत्रज्ञान चोरून माजी कर्मचारी असलेल्या अभियंत्यांनी स्वत:ची कंपनी थाटली. एवढेच नव्हे तर प्रतिस्पर्धी कंपनीला चोरून तंत्रज्ञान पुरविल्याने कंपनीचे सुमारे २६ लाख रुपयांचे नुकसान केल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
जयेश अंबादास दुंडकेकर, देवेंद्र रामेशचंद्र जैन आणि अरुण श्रीराम तिडके अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी सातारा पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपींनी एकत्र येऊन भागीदारीमध्ये वाळूज एमआयडीसीमध्ये फे ब्रुवारी २०१८ मध्ये स्वत:ची कंपनी सुरू केली आहे. तिन्ही आरोपी रेल्वेस्टेशन एमआयडीसीतील ग्रार्इंड मास्टर कंपनीत नोकरी करीत होते. त्यांनी टप्प्याटप्प्याने नोकरीचा राजीनामा देऊन ही कंपनी उभारली. ग्रार्इंड मास्टरमध्ये कार्यरत असताना जयेश दुंडकेकर अन्य आरोपींसोबत कंपनीत भागीदार झाला होता.
आरोपी हे कंपनीत कार्यरत असताना त्यांनी त्यांच्या ई-मेलवरून २००६ ते २०१८ या कालावधीत कंपनी तयार करीत असलेल्या यंत्राचे डिझाईन कोलकाता येथील प्रतिस्पर्धी कंपनीला पाठविले. त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपनीने हुबेहूब मशीन बनवून ग्रार्इंड मास्टरच्या ग्राहक असलेल्या कंपनीला विक्री केली. ही बाब समजताच कंपनीचे अधिकारी रवींद्र प्रल्हादराव गोखले यांनी याविषयी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार नोंदविली होती. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी चौकशी केली असता तक्रारीत तथ्य असल्याचे समजले. त्यानंतर याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले.