राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या या विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीने राज्यात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात जोरदार संताप व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या मुंबई आणि औरंगाबादमधील बंगल्यावर दगडफेकही केली. तसेच या विनाधप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांची २४ तासात मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन केली आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधत राज्य सरकारकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.
सुप्रियाताई हा विषय बाजूल ठेवा, महिला खासदार हा विषय बाजूला ठेवा, पण कुठल्याही महिलेला शिवीगाळ करणं हा घाणेरडा आणि गलिच्छ प्रकार आहे. त्यांच्या मनातलं लोकांसमोर आलं आहे. त्यांना पदमुक्त करणं गरजेचं आहेच, यावर उपमुख्यमंत्री काही जबाबदारी घेणार का, कारण मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाहीत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरेंनी सोमवारी सिल्लोड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला.
राज्याचे कृषीमंत्री असणारे अब्दुल सत्तार स्वत:च्या मतदारसंघातील बांधावर गेलेले नाहीत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसेच काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी छोटा पप्पू म्हणत आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. यावर देखील आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं. अब्दुल सत्तार यांनी मला छोटा पप्पू असं नाव ठेवलं. मी ते नाव स्वीकारतो. जर माझं छोटा पप्पू नाव ठेवल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांना २४ तासात नुकसानग्रस्त भरपाई देणार असतील, तर आजपासून माझं नाव छोटा पप्पू, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आपल्या राज्यात एक घटनाबाह्य कृषीमंत्री आहेत. त्यांचं नाव ‘अब्दुल गद्दार’ आहे. या मंत्री महोदयांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेला शब्द अतिशय घाणेरडा आहे. तो शब्द मी उच्चारूदेखील शकत नाही. एवढा घाणेरडा तो शब्द आहे. त्यामुळे मी आज थेट प्रश्न केंद्र सरकारला प्रश्न विचारतो की, असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का?, असे घाणेरडे लोकं तुम्हाला हवी आहेत का? जी लोकं महिलांना शिवीगाळ करतात. शेतकऱ्यांची मजा उडवतात. जिल्हाधिकाऱ्यांना ‘तुम्ही दारू पिता का?’ असं विचारतात, अशी लोकं तुम्हाला मंत्री म्हणून चालणार आहेत का?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"