वैजापूर : जेष्ठ शिवसेना ( Shiv Sena ) नेते व वैजापुरचे माजी आमदार रंगनाथ मुरलीधर उर्फ आर.एम. वाणी (८४) ( R.M. Vani ) यांचे मंगळवारी रात्री औरंगाबाद येथील खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांनी १९९९ ते २०१४ या कालावधीत सलग तीन पंचवार्षिकमध्ये विधानसभेत वैजापूर मतदारसंघाचे शिवसेनेतर्फे प्रतिनिधीत्व केले.
औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणात आर.एम. वाणी या नावाने सुप्रसिद्ध असेलेल्या वाणी यांनी १९८४ ते १९९४ या कालावधीत वैजापूरचे नगराध्यक्षपद भुषवले. पन्नास वर्षाच्या राजकिय कार्किर्दीत वाणी यांनी शहरासह ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान दिले. नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्यातुन पाणी आणण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सलग ३९ दिवस आंदोलन केले. त्याची दखल घेत राज्यपालांनी आंदोलकांची भेट घेतली. प्रशासनावर त्यांचा चांगला वचक होता. नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार असा त्यांचा राजकिय प्रवास राहिला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे, भाऊ असा परिवार आहे.
वैजापूर येथील येवला रोडवरील निवासस्थानी अंत्य दर्शनानंतर त्यांची अंत्ययात्रा निघेल. अंत्ययात्रा निवासस्थानाहून येवला रोड - डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा - संकट मोचन हनुमान मंदिर - टिळक रोड - जामा मस्जीद - पाटील गल्ली मार्गे वैजापुर अमरधाम या मार्गे निघेल. येथे सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.