- सुमेध उघडे
औरंगाबाद: १९७४ साली मराठवाडाशिक्षक मतदारसंघाची स्थापना झाली. स्थापनेपासून ते यंदाच्या निवडणुकीपर्यंत या मतदारसंघावर सुरुवातीला मराठवाडाशिक्षक संघ आणि २००४ सालापासून राष्ट्रवादीने वर्चस्व गाजवले आहे. ५० वर्षांत शिक्षक संघ आणि राष्ट्रवादी यांचे वर्चस्व राहिलेल्या मतदारसंघात भाजपाचा सलग चार वेळेस पराभव झाला.
२००४ पर्यंत शिक्षक संघाचे वर्चस्व मतदारसंघावर राहिले. १९७४ साली पहिल्यांदा या मतदारसंघात निवडणूक झाली. तेव्हा शिक्षक संघाचे डी. के. देशमुख आमदार झाले. १९८६ पर्यंत त्यांनीच मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर १९९२ पर्यंत राजाभाऊ उदगीरकर यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले. १९९८ पर्यंत पी. जी. दस्तूरकर हे आमदार होते. २००४ पर्यंत प. म. पाटील यांनी नेतृत्व केले. २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव काळे यांनी शिक्षक संघाकडून हा मतदारसंघ हिसकावला. २००६ साली वसंतराव काळे यांचे निधन झाले, त्यानंतर विक्रम काळे यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केला. तेव्हापासून विक्रम काळे यांनी या मतदारसंघात सलग निवडून येत विजयी चौकार मारला आहे.
भाजपाने २००६ पासून या मतदारसंघाकडे पूर्ण ताकदीने लक्ष देण्यास सुरुवात केली. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत यावेळच्या निवडणुकीत झाली. मात्र, अत्यंत नियोजनबद्ध प्रचारामुळे मतमोजणीतून शिक्षक संघाच्या उमेदवाराने मुसंडी मारत सर्वाना चकित केले. यामुळे यंदाची निवडणूक राष्ट्रवादी, भाजप आणि शिक्षक संघ अशी तिरंगी झाली. यात अखेर राष्ट्रवादीच्या विक्रम काळे यांनी विजय मिळवत भाजपचे किरण पाटील आणि शिक्षक संघाच्या सूर्यकांत विश्वासराव यांचा पराभव केला.