छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण आणि पद्म पुरस्कार प्राप्तांच्या गौरव सोहळ्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत आहेत. शनिवारी सायंकाळी ५ वाजता विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राची पाच कोटी रुपये खर्च करून इमारत उभारण्यात आली आहे. त्याशिवाय ऐतिहासिक महत्त्व असलेल्या विद्यापीठ गेटचे सुशोभीकरण करण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याशिवाय विद्यापीठाच्या नाट्यगृहात पद्म पुरस्कारार्थींचा सन्मान सोहळाही होणार आहे.
यामध्ये पद्मभूषण प्राप्त डॉ. अशोक कुकडे यांच्यासह पद्मश्री पुरस्काराने गौरविलेले डॉ. यु. म. पठाण, डॉ. प्रभाकर मांडे, दादासाहेब इदाते, रमेश पतंगे, गिरीष प्रभुणे, शब्बीर सय्यद, ना. धों. महानोर, कृषितज्ज्ञ श्रीरंग लाड यांचा गौरव केला जाणार आहे. त्याशिवाय दिवंगत फातेमा झकेरिया, डॉ. गंगाधर पानतावणे यांचाही मरणोत्तर गौरव केला जाणार असून, हा सन्मान त्यांचे कुटुंबीय स्वीकारणार आहेत. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.
दहा वर्षांनंतर माजी राष्ट्रपती येणारदहा वर्षांपूर्वी विद्यापीठात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने आले होते. आता या सोहळ्याच्या निमित्ताने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत आहेत. दहा वर्षांनंतर माजी राष्ट्रपती विद्यापीठात येत आहेत. हा विद्यापीठासाठी गौरवाचा क्षण असल्याचे प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.