खुलताबाद : अडीच लाख रुपयांचे ४५ लाख रुपये देऊनही सावकार मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करीत असल्याने एका माजी सरपंचाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खुलताबाद तालुक्यातील आखातवाडा- चिंचोली या गावात बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामुळे याप्रकरणी खुलताबाद पोलिसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोपट विठ्ठल बोडखे (४८), असे मयत माजी सरपंचाचे नाव आहे. संतोष उत्तमसिंग राजपूत (रा. गल्लेबोरगाव) व बाळू नलावडे (रा. बाजारसांवगी), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोपट बोडखे यांनी गल्लेबोरगाव येथील सावकारी करणारे संतोष राजपूत यांच्याकडून पाच-सहा वर्षांपूर्वी अडीच लाख रुपये व्याजाने घेतले होते. बोडखे यांनी व्याजासह एकूण ४५ लाख रुपये राजपूत यास परत केले. यानंतरही सावकार राजपूत हा आणखी पैसे बाकी आहेत, असे म्हणत असल्याने बोडखे हैराण होते.
त्याचबरोबर बाजारसावंगी येथील बाळू नलावडे हे चेक बाऊन्स प्रकरणात बोडखे यांना ब्लॅकमेल करीत होते. शिवाय पोपट बोडखे यांनी बाळू नलावडे यांना हायवा व जेसीबी भाडेतत्त्वावर कामासाठी दिले होते. त्याची मजुरीही नलावडे यांनी न दिल्याने पोपट बोडखे आणखीनच व्यथित झाले होते. संतोष राजपूत व बाळू नलावडे यांनी पैशाचा तगादा सुरूच ठेवला होता. राजपूत व नलावडे या दोघांनी धमकावल्यानंतर बुधवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मिच्छिंद्र बोडखे याने दिलेल्या फियार्दीनुसार संतोष राजपूत व बाळू नलावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी फरारआत्महत्येपूर्वी पोपट बोडखे यांनी एक व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. यात संतोष राजपूत व बाळू नलावडे यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे, तसेच कुणाकडून किती पैसे घ्यायचे व दोघांनी कसे छळले, हे व्हिडिओत सांगितले आहे. सदरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपी सावकार संतोष राजपूत व बाळू नलावडे फरार झाले आहेत.