औरंगाबाद : तुमच्या भांडणामुळे आम्हाला त्रास होतो, असे म्हणून शेजारी राहणाºया तीन भावंडांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या माजी सैनिकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील सदानंदनगरात घडली. याप्रकरणी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.बबन कुंडलिक मगरे (४६), असे मृताचे नाव असून, ते माजी सैनिक आहेत. सातारा पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री बबन मगरे हे त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून जोरात भांडत होते. या भांडणाचा आवाज ऐकून राजेश, रूपेश आणि योगेश दणके हे मगरे यांच्या घरी लाठ्याकाठ्या घेऊन आले. त्यांनी मगरे यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मगरे रक्ताने माखले. त्यानंतर त्यांची मुले त्यांना घेऊन सातारा ठाण्यात गेली. सातारा पोलिसांनी त्यांना लगेच घाटी रुग्णालयात पाठविले. रात्री साडेबारा वाजता मगरे यांना घाटीत दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती अधिक बिघडली.बबन मगरे सदानंदनगरात पत्नी आणि चार मुलांसह राहातात. बबन दारूच्या नशेत सतत पत्नी गोदावरी यांच्याशी भांडण करायचे. त्यांच्या शेजारीही माजी सैनिक दणके राहतात. दणके यांना राजेश, रूपेशआणि योगेश ही तीन तरुण मुले आहेत. ते खाजगी नोकरी करतात. काही महिन्यांपासून मगरे आणि दणके परिवारात किरकोळ कारणावरून कुरबूर होत होती. महिनाभरापूर्वी दणके कुटुंबातील पाच जणांनी मगरे यांना मारहाण केली होती. याप्रकरणी मगरे यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली नव्हती. तुमच्या भांडणामुळे आम्हाला त्रास होतो. गल्लीत अशांतता पसरते. आम्ही नीट झोपू शकत नाही, अशी तक्रार दणके कुटुंब करायचे. दणकेच्या तक्रारींकडे मगरे दुर्लक्ष करीत.चौकटघाटीतील डॉक्टरांनीच पाठविले खाजगी रुग्णालयातसकाळी सहा वाजेपर्यंत बबन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. शिवाय घाटीत न्यूरो सर्जन उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार होणार नाहीत, यामुळे रुग्णाला खाजगी रुग्णालयात घेऊन जा, असे तेथील डॉक्टरांनी मगरे यांच्या मुलांना सांगितले. त्यानंतर सहा वाजता मगरे यांना वेगवेगळ्या तीन खाजगी रुग्णालयांत नेण्यात आले. त्यानंतर पुन्हा घाटीत हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
शेजाऱ्याकडून मारहाण झाल्याने माजी सैनिकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:42 PM