- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : बलाढ्य अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन या दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर असून अहमदाबादहून विशेष विमानाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्या. त्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात वेरुळ लेणीला भेट देणार असून घृष्णेश्वराचे दर्शन घेणार आहेत.
विमानतळावरून हिलरी क्लिंटन यांचे वाहन रवाना होताना पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. विमानतळापासून ते शहराच्या हद्दीपर्यंत शहर पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आली. ग्रामीण-हद्दीत ग्रामीण पोलिसांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. ग्रामीण पोलिस दलातील १०० हून अधिक कर्मचारी व दहा ते पंधरा पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. रस्ता, मुक्कामाचे ठिकाण आणि वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर आदी ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात आहे.
हिलरी क्लिंटन भारत दौऱ्यावर असून, गेली दोन दिवसा त्या गुजरातेमध्ये होत्या. अहमदाबादहून त्या मंगळवारी औरंगाबादला दाखल झाल्या. चिकलठाणा विमानतळावर दुपारी दीड वाजेच्या सुमारास विशेष विमानाने दाखल झाल्या. खुलताबाद येथील ध्यान फार्म येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. या दौऱ्यात हिलरी क्लिंटन वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिराला भेट देण्याची शक्यता आहे. ९ तारखेला परतणार हिलरी क्लिंटन या ९ फेब्रुवारी रोजी औरंगाबादहून रवाना होणार असल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.