औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, तसेच माजी उच्च शिक्षण संचालक कारभारी पाटीलबुवा (के.पी.) सोनवणे (८१) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. जून २००० ते २००५ या दरम्यान ते कुलगुरू म्हणून कार्यरत होते.
विद्यापीठ परिसर विकासासह अनेक गोष्टींत त्यांनी मोठे योगदान दिले. खांबा-लिंबा (शिरूर कासार) येथील ते मूळ रहिवासी होते. नंतर पुण्यात स्थायिक झाले होते. धनकवडी, स्मशानभूमी (पुणे) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनवणे हे महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रातील सक्षम, सभ्य आणि सुसंस्कृत कुलगुरू व शैक्षणिक नेते होते. त्यांच्यासोबत व्यवस्थापन परिषदेत सदस्य म्हणून काम करता आले. विद्यापीठातील परिसर विकास समितीद्वारे विद्यापीठात २०० एकर फळबागेची योजना आम्ही आखली, संगणकीकरण प्लान व अंमलबजावणी केली. सर्वांना सोबत घेऊन ते काम करीत. त्यांच्या काळात लक्षणीय विकास कामे झाल्याचे एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सांगितले.
आज विद्यापीठात शोकसभाडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शनिवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती राहील. महात्मा फुले सभागृहात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होईल, असे कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी कळविले आहे.