औरंगाबाद : काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते सांगतात, आम्हाला जनतेने नव्हे ईव्हीएमने हरवले. त्यांना ईव्हीमएमने २००४ ते २०१४ पर्यंत झालेल्या निवडणुका चालल्या. आता जनतेनेच नाकारल्यानंतर ईव्हीएमला दोष देत आहेत; पण देशात ‘ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट फॉर मोदी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेता मिळण्याएवढ्यासुद्धा जागा विरोधी पक्षाला मिळणार नाहीत, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यभरात काढण्यात आलेली महाजनादेश यात्रा मंगळवारी सायंकाळी औरंगाबादेत पोहोचली.
चिकलठाणा ते मराठवाडा सांस्कृतिक मैदानादरम्यान रोड शो काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अतुल सावे, आ. सुरजितसिंह ठाकूर, आ. प्रशांत बंब, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड आदी उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजपाने विरोधी पक्षात असताना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात संघर्ष यात्रा काढत सत्तापरिवर्तन केले. आता सत्तेत असताना जनतेशी संवाद साधण्यासाठी यात्रा काढली. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विरोधी पक्षांनीही यात्रा काढल्या आहेत. त्यांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मंगल कार्यालयात सभा घ्याव्या लागत आहेत. १५ वर्षांच्या सत्ताकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांच्या माजोरी आणि मुजोरीच्या प्रवृत्तीमुळे लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. देशाच्या लोकसभेत २०१४ मध्ये विरोधकांचे विरोधी पक्षनेता बनविण्याएवढे लोक निवडून आले नाहीत. २०१९ सालीदेखील हीच परिस्थिती आली. संसदेत १० वर्षे विरोधी पक्षनेता नसेल. आता राज्याच्या विधानसभेतही तुमच्या आशीर्वादाने विरोधी पक्षाचे विरोधी पक्षनेता बनविण्याएवढे लोक निवडणूक येणार नाहीत. सत्तेत येण्याची स्वप्ने तर सोडून द्या, आता हरल्यानंतरही ते काय चुकले हे पाहत नाही. जनतेची माफी मागत नाहीत. आम्हाला जनतेने नव्हे ईव्हीएमने हरवले, असे सांगतात. बारामतीमध्ये जिंकले की ईव्हीएमचा विजय नसतो; पण आमचे दानवे जिंकले की, ईव्हीएमचा विजय असतो. एखादा बुद्दू पोरगा परीक्षेला बसून नापास झाल्यानंतर पेनला दोष देतो. आताही ही काँग्रेस-राष्ट्रवादीची नापास पोरं ईव्हीएमला दोष देत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राज्यमंत्री अतुल सावे यांनी केले. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या या जाहीर सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.