हत्या प्रकरणातील चौघांना अटक
By Admin | Published: August 18, 2015 01:35 AM2015-08-18T01:35:54+5:302015-08-18T01:35:54+5:30
साताऱ्यामधील पुसेगाव येथे झालेल्या मारामारीत दोघांची हत्या करून पळालेल्या चौघांना खारघर पोलिसांनी अटक केली आहे. गस्तीदरम्यान पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने
नवी मुंबई : साताऱ्यामधील पुसेगाव येथे झालेल्या मारामारीत दोघांची हत्या करून पळालेल्या चौघांना खारघर पोलिसांनी अटक केली आहे. गस्तीदरम्यान पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या हत्या प्रकरणात एकूण १२ गुन्हेगार असून यापूर्वी पुसेगाव पोलिसांनी दोघांना पकडले आहे.
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे तीन दिवसांपूर्वी दोन गटांत हाणामारी झाली होती. दोनही टोळ्यातील तरुण एकाच खटाव तालुक्यातील बुध गावचे असून एकाच भावकीचे आहेत. एक वर्षापूर्वी झालेल्या भांडणात सात जणांच्या एका टोळीने दुसऱ्या टोळीतील एकाच्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केलेली. याप्रकरणी त्यांना तुरुंगवास झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी ते जामिनावर बाहेर आले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी विरुध्द टोळीचा बदला घेण्यासाठी शनिवारी पुन्हा त्यांच्यावर हल्ला
केला. यावेळी दोनही गटांत झालेल्या जबर हाणामारीमध्ये दोघांचा मृत्यू झाला. दिलीप जाधव (२६) व शामराव जाधव (२८) अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे याप्रकरणी दोनही टोळीच्या १२ जणांविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
झालेला आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी दोघांना अटक केली
असून इतर दहा जण फरार
होते. त्यापैकी चौघांना खारघर पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. समीर जाधव (२२), योगेश जाधव (२१), सौरभ जाधव (१७) व कमलेश जाधव (२७) अशी त्यांची नावे आहेत.
खारघर परिसरात घडणारी गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची नाकाबंदी होती. यावेळी हिरानंदानी चौकालगत चौघे जण संशयास्पद उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्या हालचालीवर पोलिसांना संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले होते. यावेळी चौकशीत त्यांनी पुसेगाव येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप काळे यांनी सांगितले. त्याची खात्री पुसेगाव पोलिसांकडून होताच चौघांनाही अटक करण्यात आली. तसेच पुढील तपासाकरिता त्यांना पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. गुन्हा केल्यानंतर लपण्यासाठी ते नवी मुंबईत आले होते. परंतु वेळीच पोलिसांची त्यांच्यावर नजर पडल्याने त्यांना अटक झाली. (प्रतिनिधी)