फर्दापूर : फर्दापूर परिसरात बुधवारी रात्री वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात वीज कोसळून चार जनावरे जागीच ठार झाले तर विजेचे जवळपास ३० खांब व दोन रोहित्र कोसळून महावितरण कंपनीसह नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे परिसरात वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय झाली.येथील धुंदर शिवारात शेख अय्युब शेख बन्नू यांच्या शेतात वीज कोसळून शेतात बांधलेले चार बैल जागीच ठार झाल्याने शेतकरी शेख अय्युब यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, याच वेळी वादळी वाऱ्याच्या तडाख्याने फर्दापूर परिसरातील ठाणा व वरखेडी खुर्द परिसरात विजेचे ३० खांब व दोन रोहित्र कोसळले. फर्दापूर, ठाणा वरखेडी खुर्द, धनवट आदी गावातील अनेक घरांचे पत्रे उडाले. महावितरणचे लाईनमन सय्यद इम्रान सय्यद अली, समाधान नवगिरे, शेख जफर, राहुल पाटील, अरुण पाटील आदींनी भर वादळी वाºयात परिश्रम घेऊन केवळ तीन तासात विद्युत पुरवठा सुरळीत केला. रात्री उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी परिश्रम घेताना दिसले.
फर्दापूर परिसरात वीज पडून चार जनावरे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 11:38 PM